सांगे भाजपकडून काही करसेवकांचा सन्मान, तर काहींचा अपमान: विनय नाईक

प्रतिनिधी
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

विनय नाईक यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, की सांगे मतदारसंघातसुद्धा भारतीय जनता पार्टीने ठराविक करसेवकांचा सन्मान केला, तर काही करसेवकांचा अपमान केला आहे.

सांगे: अयोध्या राम मंदिर करसेवेत कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. लाखोंच्या संख्येने रामभक्त विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या करसेवेत करसेवक या नात्याने सवयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. हल्ली सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरसंदर्भात दिलेल्या ऐतिहासिक निवाड्यानंतर मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास संपन्न झाला. ही भारतवासीयांना अभिमानाची घटना आहे. मात्र, भाजपने या घटनेकडे राजकीय फायदा उठविण्याच्या हेतूने राज्यातील करसेवकांचा सन्मान घडवून आणल्याची टीका गोवा सुरक्षा मंचचे प्रदेश सरचिटणीस विनय प्रेमानंद नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

विनय नाईक यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, की सांगे मतदारसंघातसुद्धा भारतीय जनता पार्टीने ठराविक करसेवकांचा सन्मान केला, तर काही करसेवकांचा अपमान केला आहे. ज्या करसेवकांचा सन्मान झाला त्याबद्दल आनंदच आहे, पण काही करसेवकांना डावलून त्यांचा अपमान करण्याचा अधिकार सांगे भाजपला कोणी दिला हे समाजाला कळणे आवश्यक आहे. काही करसेवकांना डावलण्यात आले त्या कटात जे कोणी असतील त्यांचा जाहीरपणे निषेध करीत आहे.

आपण स्वतः करसेवक म्हणून अयोध्याला गेलो होतो. यावेळी अनेकांनी टिंगल टवाळी करून अहवेलना केली होती. उत्तरप्रदेश झांसी येथे स्थानिक कार्यकर्त्यांची राहण्याची सोय केली होती. रात्री मुक्काम असताना अचानक पोलिसांनी लाठीहल्ला केला असता, करसेवकांची धावपळीत ताटातूट झाली. पायपीट करीत मिळेल ते वाहन पकडून अल्हाबादला पोहचल्यानंतर करसेवकांना मोठ्या संख्येने पोलिसांनी पकडून एका महाविद्यालयामध्ये आठ दिवस डांबले होते. तेथून पुढे सात दिवस नैनी जेलमध्ये रवानगी केली होती. परमेश्वराच्या कार्यासाठी प्रत्यक्ष कारावास भोगला त्याचा आपल्याला अभिमान वाटत आहे, पण रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची आपल्याला कीव वाटत असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या