भाजपची आता व्यक्तीसंपर्क मोहीम

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती

पणजी

 केंद्र सरकार वर्षपूर्तीनिमित्ताने भाजप व्यापक व्यक्तीसंपर्क मोहीम हाती घेणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले पत्र व वर्षभरात केलेल्या कामगिरीची माहिती देणारे पत्रक दोन लाख घरांपर्यंत पोचवण्यात येणार आहे. कोविड विषाणू प्रसार रोखण्यासाठी समाज अंतर पाळून मोजकेच कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघवार सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, डिजीटल पद्धतीने माहिती प्रसारीत केली जाणार आहे. फेसबुक व व्हॉटसॲपचा वापर त्यासाठी केला जाणार आहे. यानिमित्ताने डिजीटल पद्धतीने सभा आयोजित केल्या जाणार आहेत. दोन सभा या पद्धतीने आयोजित केल्या जातील. या सभांना राष्ट्रीय पातळीवरील नेते मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक कार्यकर्ता मोबाईलवर व ३५ ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय करण्यात येणार आहे.
जगात भारताचा दबदबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केला. त्यामुळे भारतीयांकडे जगभरात आता आदराने पाहिले जात आहे. चीन व पाकिस्तानकडून उपद्रव होत होता त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आहे. कोविड १९ विषाणू जगात पसरला. त्या काळात खंबीर नेतृत्वाचा परिचय करून देताना टाळेबंदीसारखा योग्य निर्णय योग्य वेळी घेतला. त्यामुळे कोविडचा प्रसार रोखण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या तुलनेत रुग्ण संख्या पाहिली तर हे म्हणणे पटेल. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघर मुखावरण वाटप केले. वैद्यकीय उपकरणे निर्मितीला गती देणे, इस्पितळ रुपांतर यावर सरकारने भर दिला. स्वदेशी उत्पादने वापरण्यावरही भर देण्याचे सरकारने आवाहन केले आहे. यातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे, असे ते म्‍हणाले.
ते म्हणाले, केंद्र सरकारला दुसऱ्या टप्प्यात एक वर्ष झाले आहे. यानिमित्ताने भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ३० मे रोजी पत्रकार परिषद घेऊन सरकारची कामगिरी जनतेसमोर मांडली. आजची पत्रकार परिषद त्याचाच भाग आहे. २०१४ ला देशाला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभले. बऱ्यापैकी विकास झाला. बरेचसे ऐतिहासिक निर्णय गेल्या वर्षभरात घेण्यात आले. पहाटेच्या स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी खऱ्या होणार नाहीत अशा अवघड गोष्टीही साध्य करून सरकारने दाखवल्या आहेत. काश्मीरच्या संदर्भातील ३७० कलम रद्द होणार असा विचार कोणी करत नव्हता. त्या निर्णयाचे देशवासीयांनी उत्स्फूर्त स्वागत केले. तेथे दोन संघप्रदेश अस्तित्वात आणले. नागरिकत्व कायदा दुरुस्ती करण्यात आली. शेजारील देशांत हिंदूवर व अन्य अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अन्यायावर यातून मार्ग शोधण्यात आला. तेथील अल्पसंख्याकांना आपल्या देशाचे नागरिकत्व देण्याचा मार्ग यातून मोकळा करण्यात आला. असे विषय हाताळल्याने विरोधकांनी घाबरून आंदोलने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना जनतेची साथ मिळू शकली नाही. राममंदिर निर्माणासाठी सरकारने विश्वस्त व्यवस्था निर्माण केली. मंदिराचे कामही सुरू झाले आहे. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सरकारने व्यवस्थित हाताळला. तिहेरी तलाक पद्धती रद्द करून मुस्लीम भगिनींना न्याय दिला, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, ॲड. नरेंद्र सावईकर, राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या