भाजपचे किरण कांदोळकर करणार गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

भाजप सरकारविरुद्ध टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाशी त्यांनी संपर्क साधला होता. भाजप पक्षाकडून नेत्यांची मानहानी केली जात असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देण्याची सूचना केली होती त्यामुळे आज बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

पणजी-  भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांबरोबर वेर्ला - काणका येथील आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारविरुद्ध टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाशी त्यांनी संपर्क साधला होता. भाजप पक्षाकडून नेत्यांची मानहानी केली जात असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देण्याची सूचना केली होती त्यामुळे आज बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत तसेच इतर पदाधिकारी यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपकडून माजी आमदार किरण कांदोळकर यांना गेल्या काही महिन्यांपासून पक्षापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चालविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा पक्षाबरोबर राहणे तसेच मानहानी सहन करून घेणे शक्य नाही त्यामुळे कांदोळकर जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असे या कार्यकर्त्यांनी आपापली मते व्यक्त केली. कांदोळकर यांनी भाजप पदाधिकारी तसेच सरकारवर जोरदारपणे टीकेची झोड उठविल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनीही त्यांना पक्षात राहून अशी वक्तव्ये न करण्याचा इशारा दिला होता. कांदोळकर यांनी जरी भाजपचा राजीनामा दिला नसला तरी त्यांनी विरोधी राजकीय पक्षांशी संपर्क साधून चर्चा केली होती. त्यामुळे भाजपकडून त्यांच्या कारवायांबद्दल दखल घेण्यात आली होती मात्र पक्षातून काढण्यात आले नव्हते. ते स्वतःहून भाजपमधून बाहेर पडतात याची वाट पाहत होते. 

दरम्यान, किरण कांदोळकर यांच्याशी या बैठकीसंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी त्याला दुजोरा दिला. गेल्या काही दिवसांपासून माझ्या कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन भवितव्य असणाऱ्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करण्याची मते व्यक्त केली होती. त्यामुळे यासंदर्भात विचार करत होतो. लोकांचा निर्णय जो असेल तो मी घेणार होतो. आज कार्यकर्त्यांची घरी बैठक बोलावली व त्यामध्ये चर्चा करून निर्णय घेतला गेला. कार्यकर्त्यांनी मला गोवा फॉरवर्ड पक्षात जाण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. हा पक्षच गोमंतकियांचे हित जपणारा असल्याने त्यामध्ये प्रवेश करावा अशी मते व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य असल्याने गोवा फॉरवर्ड पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या