'भाजपच्या राष्ट्रीय प्रवाहातील अपप्रवृत्ती गोव्यात'; नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचं टीकास्त्र

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

निवडणुकीसाठी अर्ज सादर करणाऱ्याला मज्जाव करणे व धमकावणे, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराला भाजप समर्थक असल्याचे सांगण्यास भाग पाडणे अशा भाजपच्या निंद्य प्रकरणाचा गोवा फॉरवर्डतर्फे निषेध करण्यात आला.

पणजी :  देशात लोकशाही पद्धतीने होणऱ्या निवडणुका आता सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून व फसवणुकीने जिंकण्याच्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवाहामधून अपप्रवृत्ती गोव्यातही येऊ लागल्या आहेत. निवडणुकीसाठी अर्ज सादर करणाऱ्याला मज्जाव करणे व धमकावणे, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराला भाजप समर्थक असल्याचे सांगण्यास भाग पाडणे अशा भाजपच्या निंद्य प्रकरणाचा गोवा फॉरवर्डतर्फे निषेध करण्यात आला. पणजीतील गोवा फॉरवर्ड मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपाध्यक्ष मोहनदास लोलयेकर म्हणाले की, लोकशाहीच्या नावाने देशात निवडणुका घेणे हे फक्त आता नावापुरतेच राहिले आहे. देशातील भारतीय घटनेत प्रत्येकाला अधिकार होते ते तुडविले जात आहेत. लोकशाहीची गळचेपी करणे केंद्र सरकारने सुरू केले आहे. जो कोणी केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविल त्याच्याविरुद्ध सरकारी यंत्रणांचा वापर करून छापे व सतावणूक केली जाते. गोव्यातील पालिका निवडणुका कोणत्याही प्रकारे जिंकण्यासाठी भाजपने धमकावणे व जबरदस्ती करण्याचे प्रकारे सुरू केले आहेत. केपे पालिका निवडणुकीत रमेश नाईक याला उमेदवारी अर्ज सादर करण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी अटकाव केला.

गोवा विधानसभा निवडणुक 2021: शिवसेना 20 ते 25 जागा स्वबळावर लढविणार

भाजप समर्थक उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्यासाठी हा प्रयत्न होता. यासंदर्भात नाईक यांनी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करताच त्यांना उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी त्यांनी मदत केली. याप्रकरणी निर्वाचन अधिकाऱ्यांनी नाईक यांना उमेदवारी अर्ज सादर करण्यास अटकाव करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याची गरज होती मात्र ती करण्यात आली नाही. चिखली येथील बिनविरोध निवडून आलेल्या महिला उमेदवाराला भाजप कार्यकर्त्यांनी तिला व तिच्या कुटुंबियांना धमकावण्याचे काम मंत्र्यांच्या स्वीय सचिवाने केले. तिला भाजप समर्थक असल्याचे वक्तव्‍य करण्याची जबरदस्ती करण्यात आली. ती अपक्ष म्हणून निवडून आल्याने भाजपने तिला धमकावून व जबरदस्तीने आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणेने सरकारच्या निर्देशानुसार गैरमार्गाचा करून निवडणुकीतील उमेदवारांची छळणूक केली जाऊ नये अशी मागणी लोलयेकर यांनी केली.

आता म्हापसा भाजपमध्येही कलहनाट्य; स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्या विरोधात नाराजीचा सूर

सध्या सत्ताधारी पक्षाची विनाशकारी विपरित बुद्धी झाली आहे. त्यांना पालिका निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी हा सर्व आटापिटा सुरू आहे. चिखली पंचायत प्रभागमधून बिनविरोध निवडून आलेल्या व धमकावणीमुळे भयभीत झालेल्या महिला उमेदवाराला धीर देण्यास गेलेल्या धर्मगुरूला उद्धटपणे उत्तरे दिली गेली. ज्याने या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल केला त्याला तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या पालिका निवडणुकीत बहुमताने जिंकणे कठीण आहे हे भाजपला कळून चुकले आहे त्यामुळे त्यांचे नेते व कार्यकर्ते असे प्रकार करत आहेत. या घटनांचा लोकशाहीप्रेमींनी निषेध करायला हवा, असे गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक म्हणाले. केंद्र व राज्य सरकार असंवेदनशील बनले आहे. केंद्रातील शेतकरी आंदोलन तसेच राज्यातील मोले प्रकल्प आंदोलन होऊनही त्यांना जनतेचे सोयरसुतक नाही. राज्यात लोकांमध्ये सरकारबाबत असंतोष आहे तो येत्या पालिका निवडणुकीत दिसून येईल असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या