भाजपने परदेशी गोमंतकीयांची माफी मागावी- विरोधी पक्ष नेते कामत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

परदेशातील गोमंतकीयांना गोव्याच्या समस्यांवर भाष्य करण्याचा व त्यावर आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही कामत यांनी म्हटले आहे.  

मडगाव-  परदेशी वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक गोमंतकीयास आपल्या मातीचा अभिमान आहे. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर वास्तव्य करणाऱ्या गोमंतकीयांचे मातीसाठी चांगलेच योगदान आहे. भाजपने विदेशात वास्तव्य करणाऱ्या या गोमंतकीयांना 'बेडके' असे म्हणून त्यांना अपमानित केले आहे. पक्षाने त्वरीत हे विधान मागे घेऊन त्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

गोव्याच्या हिताच्या विधायक सूचना समजून घेणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. परदेशातील गोमंतकीयांना गोव्याच्या समस्यांवर भाष्य करण्याचा व त्यावर आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही कामत यांनी म्हटले आहे.  

राज्यातील भाजप सरकारने विदेशातील पोटापाण्यासाठी गेलेल्या गोमंतकीयांच्या प्रती नेहमीच सापत्न वागणुकीचे धोरण अवलंबले आहे. आज, निवृत्त झालेले दर्यावर्दी तसेच खलाशांच्या विधवांवर पेंशन मिळविण्यासाठी सरकारकडे भीक मागण्याची वेळ राज्यातील भाजप सरकारने आणली आहे. भाजप नेहमीच खलाशांच्या प्रश्नांवर असंवेदनशील भूमिका घेते, असेही कामत यावेळी म्हणाले.   

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यांच्यावेळी तेथील भारतीयांसमोर जोरदार भाषणे करून आपली जाहिरातबाजी करतात. हे स्थानिक नेत्यांनी लक्षात ठेवावे. भारतीय जनता पक्ष त्यांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी करते का? असा सवालही कामत यांनी यावेळी उपस्थित केला.  

संबंधित बातम्या