भाजपची निवडणुकीसाठी व्यूहरचना

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

विधानसभा निवडणुकीला १५ महिने असले, तरी राजकीय हालचालींचा वेग आणि दिशा पाहता निवडणूक पुढील वर्षीही होऊ शकते. ते गृहीत धरून सत्ताधारी भाजपने व्यूहरचना तयार केली आहे.

पणजी :  विधानसभा निवडणुकीला १५ महिने असले, तरी राजकीय हालचालींचा वेग आणि दिशा पाहता निवडणूक पुढील वर्षीही होऊ शकते. ते गृहीत धरून सत्ताधारी भाजपने व्यूहरचना तयार केली आहे. पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे.

सध्या सरकारविरोधी वातावरण असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत असले तरी काही प्रकल्पांना होणारा विरोध हा नेहमीच्याच ठरावीक व्यक्तींकडून केला जात असल्याचे सरकारच्या आणि भाजपच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होऊ शकणारी संभाव्य पक्षांतरेही जमेस धरण्यात आली आहेत. कधीही निवडणुका झाल्या तरी भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी आखणी करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी स्वयंपूर्ण गोवा या सरकारी योजनेखाली देण्यात येणारा भर हा याच राजकीय डावपेचाचा एक भाग आहे.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांच्याकडे तो सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना यानंतर राज्यभरात दौरे करणे सोपे जावे. यासाठी ते आताच मतदारसंघातील जनतेशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समस्या सोडवण्यावर भर देत आहेत. त्यांच्या मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी काही खास कार्यकर्त्यांची तेथे नियुक्ती केली जाणार आहे. प्रत्येक महिन्याला सरकारने काय करावे आणि त्याला पूरक असे पक्षाकडून काय केले जावे. यासाठी समन्वयकाच्या आधारे काम करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

कोणत्या मतदारसंघात उमेदवार बदलण्याची गरज आहे. कोणत्या मतदारसंघातील आमदार ऐनवेळी दगाफटका करू शकतो. कोणत्या मतदारसंघात आणखीन जोर लावण्याची गरज आहे. या साऱ्याची माहिती भाजपने याआधीच संकलित केली आहे. विधानसभा निवडणुकीआधी होणाऱ्या जिल्हा पंचायती व पालिका मंडळांच्या निवडणुकीत भाजपलाच यश मिळाले पाहिजे यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या