सावर्डेत भाजपतर्फे सेवा सप्ताहास प्रारंभ

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

विविध लोकोपयोगी कार्यक्रमांच्या आयोजनाची मंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती

धारबांदोडा: सावर्डे मतदारसंघ भाजप मंडळातर्फे सध्या सेवा सप्ताह सुरू आहे. यानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या भागाचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली. 

मोले येथे पंचायत सभागृहात सेवा सप्ताह आयोजित करण्यासंबंधी झालेल्या बैठकीत त्यांनी या सेवा सप्ताहानिमित्तच्या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या सेवा सप्ताह कार्यक्रमात येत्या गुरुवारी १७ रोजी पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळाचे वाटप करण्यात येणार आहे. 

रविवारी २० रोजी मतदारसंघातील सातही पंचायतक्षेत्रामध्ये प्रत्येकी दहा झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पूर्ण दिवसभर चालणार आहे.

शुक्रवारी २५  रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान खादी आणि ग्रामोद्योग खात्याअंतर्गत युवावर्गासाठी स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर या उपक्रमाला चालना देण्यात येणार आहे. 

तर २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत उपक्रमाअंतर्गत प्रत्येक पंचायत क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मोले येथे पंचायत सभागृहात झालेल्या या बैठकीत मंत्री दीपक पाऊसकर यांच्यासोबत मंडळाध्यक्ष विलास देसाई, उपाध्यक्ष आपा गावकर, काले पंचायतीचे सरपंच किशोर देसाई, मोले सरपंच तन्वी केरकर, सावर्डे सरपंच संदीप पाऊसकर, तथा साकोर्डा पंचायतीचे पंचसदस्य शिरीष देसाई, साकोर्डो सरपंच जितेंद्र नाईक, बुथ अध्यक्ष व मडंळाचे सदस्य उपस्थित होते. शिरीष देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले. तन्वी केरकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या