गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला यश मिळाल्याने विरोधी पक्षांना भरली धडकी

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीश यश मिळाल्याची धडकी विरोधी पक्षांना भरली असून त्यांनी या त्सुनामीतून कसे सावरावे, ​

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीश यश मिळाल्याची धडकी विरोधी पक्षांना भरली असून त्यांनी या त्सुनामीतून कसे सावरावे, यावर तातडीने विचार करणे सुरू केले आहे. काँग्रेसमधील काहीजणांनी नेतृत्त्‍व बदलाची मागणी पुढे आणली असून गोवा फॉरवर्डला फोंडा गट समिती बरखास्त करावी लागली आहे. भाजपने याखेपेला जरा जास्तच बेरजेचे राजकारण केले. त्यामुळे भाजपला पक्ष संघटनेकडून मदत झालीच. याशिवाय पक्षाबाहेर असलेल्या सहानुभूतीदारांकडूनही मदत झाली. यामुळे भाजपचे ३३ उमेदवार निवडून येऊ शकले. 

या यशामुळे भाजपला कोणी कोणी मदत केली असू शकते. पती भाजपमध्ये असतानाही पत्नीला कोणाच्या सांगण्यावरून कोणी उमेदवारी दिली, याची खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे छातीठोकपणे दोन्ही जिल्हा पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकेल, असे सांगत असताना केवळ तीन जागांवर समाधान मानण्याची वेळ काँग्रेसवर आली.

चोडणकर लक्ष्‍य, 
रेजिनाल्‍ड यांचे नाव चर्चेत

या साऱ्याचे खापर काँग्रेसजनांनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर फोडणे सुरू केले आहे. पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात गट समित्या स्थापन करा, असे सांगूनही चोडणकर यांना तसे करण्यास यश आले नाही. कारण त्यांच्या नेतृत्त्वाला राज्यभरात मान्यता नाही असा अर्थ काहींनी काढण्यास सुरवात केली आहे. कालच्या निकालानंतर दिल्लीत आणि दिनेश गुंडुराव यांच्याकडे योग्य ती माहिती पोचवणे सुरू झाले आहे. याचीच संधी घेऊन काही ज्येष्ठांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे नावही पुढे करणे सुरू केले आहे. मध्यंतरी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांच्या नावाची चर्चा या पदासाठी होती. मात्र, काही ज्येष्ठांचीच त्यांच्या नावाला नापसंती होती. त्यामुळे आता रेजिनाल्ड यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
 
आत्‍मपरीक्षण सुरू
भाजपच्या या झंझावातापुढे दक्षिण गोव्यातील तीनच जागांवर मर्यादित झालेल्या मगोनेही आत्मपरीक्षण करणे सुरू केले आहे. मगोची पारंपरिक मते कुठे व कशी फुटली. ती फोडण्यासाठी पक्षातील कोणी मदत केली का? कोणी पक्षाचे काम न करता थंड राहणे पसंत केले का? याची चाचपणी करणे सुरू केले आहे. मगोने कोणावर कारवाईचा बडगा उगारलेला नसला तरी नेहमी एकत्र असणारे आणि एका बंडखोर नेत्याच्या सातत्याने संपर्कात असलेले त्रिकुट मगोच्या नेत्यांच्या नजरेत आले आहे. त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. आमसभेच्या तोंडावर उगाच वाद नको म्हणून मगो पक्षाच्या वरिष्ठांनी थोडे सबुरीने घ्यायचे ठरवले आहे. मात्र, पक्षाची संघटनात्मक बांधणी निष्ठावंतांना सोबत घेऊनच यापुढे करावी लागेल, यावर मगोच्या नेत्यांचे एकमत झाले आहे.

गोवा फॉरवर्ड बंडखोरांविरुद्ध आक्रमक
गोवा फॉरवर्डने तर जाहीरपणे फोंड्यातील गट समितीने पक्षविरोधी कारवाया केल्याचे मान्य केले आहे. त्यांनी तातडीने फोंड्याची गट समिती बरखास्त केली आहे. त्या ठिकाणी नवी समिती निवडली जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर झालेली ही पहिलीच जाहीर कारवाई आहे. सत्ताधारी भाजपने यश मिळवले असले, तरी बहुतांश उमेदवार चार- पाचशे मतांनी विजयी झाल्याने एकहाती विजय का मिळाला नाही, याची कारणमिमांसा करणे सुरू केले आहे. विरोधक एकत्रित लढले तर काय चित्र होईल याचा अंदाज आताच घेण्याच येत आहे. मतविभागणी कशी झाली, याचा अभ्यास करून येत्या काही दिवसांत भाजप मंडळ पातळीवर बौद्धिक घेणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही, हे खरे आहे. जसे यशाचे धनी अनेक असतात तसे अपयशाची जबाबदारी सामूहिक आहे. उमेदवार, मतदारसंघ प्रभारी यांच्याशी बोलल्यानंतरच पराभवाची कारणे समजणार आहेत. मी मागेच राजीनामा दिला होता तो नामंजूर झाला, नव्याने मला त्यासाठी कोणी संपर्क साधलेला नाही.
- गिरीश चोडणकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

पक्षाला अपेक्षित यश का मिळाले नाही, याविषयी निश्चितच चिंतन केले जात आहे. पक्ष यातून सावरेल. राज्यात प्रादेशिक पक्षांचे राजकारण करण्यास काहींना मगोचा अडसर वाटत आहे त्यांचे उपद्‍व्‍याप यामागे आहेत.
- दीपक ढवळीकर, मगोचे अध्यक्ष

संबंधित बातम्या