स्वयंपूर्ण गोव्याकडे भाजप सत्तेची वाटचाल

BJP will come to power in Goa in 2022 with a majority
BJP will come to power in Goa in 2022 with a majority

दाबोळी: भाजप २०२२ साली बहुमताने सत्तेवर येणार असल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते विकास कामात अडथळे आणत आहेत. लोकांनी त्यांच्या कारवायांना बळी पडू नये. कार्यकर्त्यांनी लोकांशी संपर्क साधून सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.


दाबोळी भाजप मंडळाने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री दिल्लीहून दाबोळी विमानतळावर दाखल होताच प्रथम वास्को व नंतर मुरगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण शिबिराला भेट दिल्यानंतर दुपारी दाबोळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, बोगमाळोचे सरपंच लॉरेन कुन्हा, चिखलीचे सरपंच सेबी परेरा, स्थानिक पंच संकल्प महाले तसेच गट अध्यक्ष संदीप सूद, संतोष केरकर, सर्वानंद भगत, सत्यविजय नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी स्वयंपूर्ण गोवा बनविण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवाव्यात. आपल्यासारखा सामान्यातील सामान्य कार्यकर्ता या पक्षात मुख्यमंत्री होऊ शकतो हे या पक्षाचे मोठेपण आहे. भाजपच्या कार्यकर्त्यावर माझा पूर्ण विश्वास असून कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजप गोव्यात पुन्हा सत्तेवर येणार आहे. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. पक्षामध्ये कार्यकर्त्यांना महत्त्व आहे. सरकारकडून होणारा विकास विरोधकांना पाहावत नाही. काही राजकीय पक्ष आपले जाहीरनामे लोकांना सांगू लागले आहेत. गोवेकरांना काय हवे व काय नको हे भाजपला  माहीत आहे, हे सांगताना त्यांनी आम्ही गोव्यातील कोळसा वाढू देणार नाही. कोळशाची मात्रा ५० टक्‍क्‍यांनी कमी करणार आहोत. वेळ पडल्यास कोळसा बंद करण्यासाठी सरकार मागेपुढे पाहणार नाही. तसेच तामणार प्रकल्प गोव्यासाठी महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प झाला नाही तर दोन वर्षानंतर येथे शटडाऊनची वेळ येईल. अपुऱ्या विजेमुळे अनेक समस्या निर्माण होतील. पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल.


पंचायतमंत्री तथा दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो म्हणाले, की चिखलीतील काही युवकांना आपण धमकी दिल्याचे मला ऐकण्यात येते, पण तसे काही नसून मी कोणालाही धमकी दिली नाही. विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत. रस्त्यावर आणून त्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. आपणास भेटण्यास आलेल्या युवकांना आपण तुमच्यावर गुन्हे दाखल करणार म्हटलेले नाही. मात्र, कोकण रेल्वे आंदोलन करताना काही युवकांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांना सरकारी नोकरी मिळणे, विदेशामध्ये जाणे शक्य झाले  नव्हते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आम्हाला कोणता त्रास पडला आहे याविषयी आपण त्यांना सांगितले आहे.

‘खनिज व्यवसाय लवकरच सुरू’
आपण दिल्ली भेटीत केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, गृहमंत्री अमित शहा व इतर नेत्यांच्या भेटी घेतल्या. यात मुख्य गोव्याच्या खाण प्रश्‍नावर चर्चा झाली. लवकरच खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे राज्याचा आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत मदत होईल व राज्य आर्थिकदृष्ट्या मागे राहणार नाही. सरकार गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करणार आहे. या योजनेमुळे काहींच्या पोटात दुखू लागले आहे. सरकार विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यापैकी साठाव्या वर्षांनिमित्त गोव्यातील बाराही तालुक्यात कार्यक्रम होतील. विद्यार्थी, कलाकार, गोरगरीब अशा सर्वांपर्यंत सरकार पोहोचणार आहे. गोवा कसा आहे, गोव्याची संस्कृती काय आहे या संबंधीची माहिती देशातच नव्हे, तर देशाबाहेर पोहोचली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com