महापालिकेत भाजप ‘क्लिनस्विप’ करणार

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

येत्या महापालिका निवडणुकीत भाजप ३० ही जागांवर विजयी होऊन ‘क्लिनस्वीप’ देईल. सर्व नगरसेवक निवडून येणारच, असा आत्मविश्‍वास आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. 

पणजी : येत्या महापालिका निवडणुकीत भाजप ३० ही जागांवर विजयी होऊन ‘क्लिनस्वीप’ देईल. सर्व नगरसेवक निवडून येणारच, असा आत्मविश्‍वास आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. 

सांतिनेज येथील स्मशानभूमीच्या कामाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून आल्यानंतर आमदार मोन्सेरात बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासमवेत महापौर उदय मडकईकर उपस्थित होते. वन खात्याच्या इमारतीत आमदार मोन्सेरात यांच्याबरोबर आयुक्त संजित रॉड्रिग्ज, नगरविकास खात्याचे अधिकारी, सांतिनेज स्मशानभूमी कंत्राटदार यांची उपस्थिती होती. 

येत्या तीन महिन्यानंतर महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागणार आहेत. या निवडणुकीकडे आत्तापासूनच सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवार आत्तापासूनच तयारीला लागले आहेत, तर काहीजणांना आपला पत्ता कट होणार आहे याची पक्की जाणीव झाली आहे. त्याचबरोबर काही नगरसेवकांनी आपला प्रभाग आरक्षीत होणार, अशी शक्यता धरून दुसऱ्या प्रभागांची चाचपणीही करण्यास सुरवात केली आहे. त्याशिवाय बाबूश मोन्सेरात यांच्यावर विश्‍वास ठेवून काम करणाऱ्या त्यांच्या गटाच्या (पूर्वीच्या) काहीजणांना तिकीट मिळणार असल्याचे सांगत आमदार मोन्सेरात यांनी माजी महापौर विठ्ठल चोपडेकर यांचे नाव घेत त्याचे सूतोवाच दिले.

यापूर्वी भाजप आणि मोन्सेरात गट अशी लढत होत होती, पण आता मोन्सेरात भाजपमध्ये आल्याने ते भाजपचेच ३० उमेदवार निवडून येतील, असे आत्मविश्‍वासाने सांगत आहेत. 

दरम्यान, बायंगिणी प्रकल्पाची गरज असून, तो न्यायालयाच्या देखरेखेखाली होत आहे. तिसवाडीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, असे सांगत त्यांनी प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय वादंगापासून सुरक्षीत पाऊल उचलले असल्याचे दिसून येते. तसेच स्मशानभूमीच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही, असे सांगत लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्यास संबंधित कंत्राटदाराला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सूचना केल्याची माहिती महापौर मडकईकर यांनी दिली.

संबंधित बातम्या