पर्वरीत यंदा कमळ फुलणार?

'जुन्या, नव्या भाजप कार्यकर्त्यांची मने जुळेनात;...तर रोहन खंवटेंची हॅटट्रिक'
Porvorim constituency
Porvorim constituencyDainik Gomantak

पर्वरी : पर्वरी मतदारसंघाची नव्याने रचना झाल्यापासून रोहन खंवटे सलग दोनदा विजयी झाले आहेत. पण यावेळेस ते पहिल्यांदाच भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. या मतदारसंघातील मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत असल्याचा दावा ते करतात. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची कमालीची गोची झाली आहे. त्या पक्षातील इच्छुक उमेदवारांसह निष्ठावंत कार्यकर्ते कमालीचे दुखावले आहेत.

पक्षशिस्त म्हणून काही कार्यकर्ते मन मारून त्यांच्यासोबत प्रचार करताना दिसत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या बाजूने एकेकाळचे त्यांचे खंदे समर्थक संदीप वझरकर हे तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही निवडून येण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहेत. एकमेकांच्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रारी नोंद आहेत. कॉंग्रेस पक्षातर्फे विकास प्रभुदेसाई हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नुकतेच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयही उघडले आहे.

Porvorim constituency
'सरकार आल्यावर आम्ही राज्याचा पैसा कुठे गेला याची चौकशी करू'

आम आदमी पक्षातर्फे (AAP) रितेश चोडणकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचा दावा ते करत आहेत. विद्यमान माजी आमदार रोहन खंवटे सलग दोनदा अर्थात 2012 आणि 2017 मध्ये विजयी झाले होते. आता तिसऱ्यांदा विजयी होऊन ते हॅटट्रिक साधणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पर्वरी परिसरातील सुकूर, साल्वादोर दु मुंद आणि पेन्ह द फ्रान्का या तीन पंचायती हळदोणा मतदारसंघातून वगळून 2012 साली नवीन पर्वरी (Porvorim) मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यामुळे बार्देश तालुक्यात आणखी एका मतदारसंघाची भर पडली. सध्या बार्देस तालुक्यात एकूण सात मतदारसंघ आहेत. आमदार खंवटे यांना दोन निवडणुकांचा भरपूर अनुभव असल्याने ही निवडणूक जिंकणे तसे त्यांना फार कठीण नाही. तसेच मतदारसंघातील प्रत्येक मतदाराशी त्यांचा संपर्क असल्याने त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होणार आहे.

पर्वरी मतदारसंघात सुमारे26,752 मतदार आहेत. त्यात पुरुष 13,061 तर महिला 13,690 आणि एक तृतीयपंथी यांचा समावेश आहे. सुकूर तसेच पर्वरी जुना बाजार परिसरात भंडारी समाजाची संख्या लक्षणीय आहे, तर पेन्ह दी फ्रान्कातील बिठ्ठोणमध्ये खारवी समाज मोठ्या संख्येने आहे. या मतदारसंघावर ख्रिश्चन समाजाचेही वर्चस्व आहे. त्या समाजातील मतदानाच्या टक्केवारीवर निवडणुकीचा अंदाज वर्तविण्यास येतो. काही प्रमाणात हा घटक निर्णायक भूमिका बजावतो. खंवटे यांनी आपल्याकडे असलेले मतदार कायम आपल्याकडेच राहतील, यादृष्टीने वेगवेगळे आडाखे बांधून वाटचाल सुरू केली आहे.

Porvorim constituency
नेत्रावळीत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार; सावित्री कवळेकर

- ख्रिस्ती मते निर्णायक ठरणार

गेल्या निवडणुकीवेळी (Election) प्रचारादरम्यान आपण भाजपसारख्या (BJP) जातीयवादी पक्षाला कधीच समर्थन देणार नाही, असे छातीठोकपणे सांगत त्यांनी ख्रिस्ती मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी मिळवले होते. त्यांची एकगठ्ठा मतेही मिळवून ते विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी सरकार स्थापनेवेळी कॉंग्रेस पक्षाला समर्थन देण्याऐवजी भाजपला समर्थन देऊन मंत्रीही झाले. त्यामुळे त्यांच्यावर ख्रिस्ती मतदार प्रचंड नाराज झाले आहेत. त्याचा काही प्रमाणात फटका खंवटे यांना यावेळेस बसू शकतो.

- रोहन खंवटेंचा कॉंग्रेसला चकवा

मध्यंतरी खंवटे यांनी कॉंग्रेस (Congress) पक्षातर्फे निवडणुकीत उतरण्याची तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी समर्थकांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची सूचना केली होती आणि त्यांनी प्रवेशही घेतला होता; पण असा कोणता चमत्कार झाला माहिती नाही; पण चक्क एकाच महिन्याच्या आत कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन ते सर्वजण स्वगृही परतले. त्यानंतर खंवटे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही देण्यात आली. सध्या त्यांचा प्रचार जोरात चालला आहे. गेली दहा वर्षे आमदार, मंत्री या नात्याने त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. ‘हरित पर्वरी’च्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.

- प्रकल्प भरमसाट; पण अपूर्ण

या मतदारसंघात खेळण्याचे एकही मैदान नाही. तसेच अनेक प्रकल्प सुरू आहेत; पण ते अर्धवट स्थितीत आहेत. पाणी समस्या तर पर्वरीवासीयांच्या पाचवीला पुजली आहे. वाढत्या झोपडपट्ट्या, गुंडगिरी, चोऱ्या, ड्रग्सचा सुळसुळाट यासारख्या समस्या येथे फोफावल्या आहेत. येथे मलनिस्सारण प्रकल्पाची नितांत गरज आहे. भुयारी वीजजोडणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पण अजून कार्यान्वित झालेले नाही.

- नगरपालिकेचा प्रस्ताव बासनात

पर्वरी मतदारसंघ तीन पंचायतींनी विभागाला असल्याने सर्व ठिकाणी समान विकास होत नाही म्हणून काही लोकांनी नगरपालिकेचा प्रस्ताव मांडला आहे. पण त्याला स्थानिक पंचायतींचा विरोध असल्याने तो प्रस्ताव बारगळल्यात जमा आहे. हे व असे अनेक विषय ऐन निवडणुकीच्या तोंडावर कळीचे मुद्दे ठरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या समस्यांबाबत काय उपाययोजना करणार, हे आधी जाहीर करणे हिताचे ठरणार आहे.

- कॉंग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव

या मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाची स्थिती फारच बिकट आहे. राष्ट्रीय पक्ष असूनही या मतदारसंघात त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळे पक्षाची वाताहत झाली आहे. सध्या विकास प्रभुदेसाई यांना कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीवरून पर्वरी कॉंग्रेस मंडळात फूट पडली होती. पण नंतर पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून मंडळाने पक्षहितासाठी प्रभुदेसाई यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचा दावा ते करीत आहे.

- ...तर ‘आप’चे पारडे जड

एकेकाळचे कॉंग्रेस गटाध्यक्ष शंकर फडते हे माकडउड्या मारत तृणमूलनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाऊन स्थिरावले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. ते आपल्या परीने प्रचार करताना दिसतात. आम आदमी पक्षाचे रितेश चोडणकर यांनीही प्रचाराचा जोर लावला आहे. भाजपचे असंतुष्ट कार्यकर्ते रितेश चोडणकर यांच्या बाजूने कौल देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. परिणामी त्यांचे पारडे जड होऊ शकते.

- 2012 च्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत अपक्ष आमदार रोहन खंवटे विजयी झाले होते. त्यांना 7972 मते मिळाली होती.

- त्यावेळी भाजपचे गोविंद पर्वतकर यांना 7071 मते मिळाली होती. विजयी उमेदवार खंवटे यांना 901 मतांची आघाडी मिळाली होती.

- त्यावेळी एकूण 16,631 मतदान झाले होते. त्याची टक्केवारी 47.93 इतकी होती.

- 2017 सालच्या दुसऱ्या निवडणुकीत पुन्हा अपक्ष आमदार रोहन खंवटे विजयी झाले. त्यांना 11,174 मते मिळाली. - भाजपचे गुरुप्रसाद पावसकर यांना 6961 मते मिळाली.

- खंवटे यांना तब्बल 4213 मतांची आघाडी मिळाली होती.

- त्यावेळी एकूण मतदान 19658 झाले. त्याची टक्केवारी 56.85 इतकी होती.

- या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे राजेश वळवईकर यांना 846 मते मिळाली होती.

- राजेश आमोणकर (मगो) 222, विल्बर टिकलो (अपक्ष) 144, तर राजू डिसोझा (समाजवादी जनता पक्ष) 133 मते मिळाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com