जिल्हा पंचायत निवडणूक: भाजपच्या विशेष कामगिरीनंतर विरोधकांची ‘बोलती बंद’

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

र्वीची भाजप आणि आता कॉंग्रेसमधून कार्यकर्त्यांसह आलेल्या १० आमदार युक्त भाजप यांनी एकत्रितपणे लढण्याचे कसब या निवपूडणुकीत दाखवले आहे. याचे सकारात्मक परिणाम भाजपला विधानसभा निवडणुकीत दिसून येऊ शकतात.

पणजी- विविध प्रकल्पांविरोधात होणारी आंदोलने, विरोधकांकडून एकत्र येण्याची बोलली जाणारी भाषा, समाज माध्यमांवरून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे होणारे जोरदार प्रयत्न, या साऱ्या विरोधी वातावरणाचा भेद करत सत्ताधारी भाजपने उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. जनतेने विरोधकांना सपशेल नाकारल्याचेही या निवडणुकीतून सिद्ध झाले. महाराष्‍ट्रवादी गोमंतक पक्ष आणि काँग्रेसची ताकद संकुचित झाल्याचे दिसून आले आहे. भाजपविरोधी वातावरण राज्यात आहे आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत ते दिसून येईल, असे सांगणाऱ्यांची बोलती बंद करणारा असा आजचा निकाल आहे.  भाजप पक्ष संघटनेचे तळागाळापर्यंत असलेली ताकद आणि आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने हे यश आज भाजप खेचून आणू शकला आहे. काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आपण विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही या निवडणुकीत भाजपचे गड राखले आहेत. पूर्वीची भाजप आणि आता कॉंग्रेसमधून कार्यकर्त्यांसह आलेल्या १० आमदार युक्त भाजप यांनी एकत्रितपणे लढण्याचे कसब या निवडणुकीत दाखवले आहे. याचे सकारात्मक परिणाम भाजपला विधानसभा निवडणुकीत दिसून येऊ शकतात.

जिल्हा पंचायत निवडणुकीतील मतदानावेळी मतदानाचा टक्का ९.६१ टक्क्याने घसरला तेव्हाच भाजप या निवडणुकीत विजयी होईल, असे पक्षाच्या गाभा समितीला वाटले होते. सर्वसाधारणपणे मतदानाचा टक्का वाढला तर सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी व्यक्त करण्यासाठी जनता घराबाहेर पडली होती, असे मानले जाते. मात्र टक्केवारी घसरल्याने ती भाजपला फायदेशीर ठरेल असे वाटत होते तेच आज दिसून आले. 

आभासी बैठकांचे फलित

भाजपने कोविड महामारीच्या काळात आपल्या पक्षाच्या संघटनेला कार्यरत ठेवले. आभासी बैठकांच्या माध्यमातून पक्ष संघटनेला लक्ष्य दिले. कधीतरी जिल्हा पंचायत निवडणूक घ्यावीच लागेल याचे भान ठेऊन मतदार बैठका घेणे सुरू ठेवले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर प्रचाराला परवानी दिली नव्हती, तरी त्याचा मोठा फटका भाजपला बसला नाही. भाजपच्या पराभूत उमेदवारांना मात्र बंडाळीचा फटका बसला आहे. त्याकडे आता भाजपला लक्ष पुरवावे लागणार आहे. भाजपने या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ३३ जण विजयी झाले. यामुळे भाजपने या निवडणुकीच्या परीक्षेत ८०.५ टक्के गुण मिळवल्याचे दिसते. राज्यात २००० साली जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांना सुरवात झाली, तेव्हापासून आजवर कोणत्याही एका पक्षाला जिल्हा पंचायत निवडणुकीत असे यश मिळालेले नव्हते.

मायकल लोबोंकडून विरोधक दुसऱ्यांदा चीतपट

कळंगुटमध्ये माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व जोसेफ सिक्वेरा अशा दोन प्रबळ स्थानिक नेत्यांचे मोठे आव्हान असताना तसेच त्या भागात सरकारविरोधात विविध समाजघटकांकडून झालेल्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मायकल लोबो यांचा कळंगुट हा बालेकिल्ला उद्‍ध्वस्त होतोय की काय, अशी परिस्थिती होती. तथापि, त्याबाबत सुमारे पाचशे मतांच्या मताधिक्क्यांनी भाजप उमेदवार तिथे निवडून आला. सुकूर मतदारसंघातही भाजपचा उमेदवार पाचशे मतांनी का असेना निवडून आणणे लोबो व भाजप कार्यकर्त्यांना शक्य झाले. त्या ठिकाणी त्यांना आमदार रोहन खंवटे व जयेश साळगावकर यांच्या राजकीय डावपेचांचा प्रखर सामना करावा लागला. कळंगुट मतदारसंघ राखण्यात, तर सुकूर मतदारसंघातील बलाढ्य आमदाराला चीत करण्यात अखेर त्यांना यश आले. तात्पर्य, मायकल लोबो दुसऱ्या मतदारसंघातील आमदार खंवटे यांना वरचढ ठरलेच!

संबंधित बातम्या