भाजपचा फोंडा, मडकईवर डोळा..!

Narendr Tari
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

फोंडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे रितेश व रॉय नाईक हे दोन्ही पुत्र काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात सामील झाल्याने फोंड्याबरोबरच तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फोंड्याबरोबरच तालुक्‍यातील इतर विधानसभा मतदारसंघातही ही समीकरणे बदलणार असून उमेदवारही बदलण्याची शक्‍यता आहे. मूळात भाजपला फोंड्यात यावेळेला विधानसभा निवडणुकीत विजय अपेक्षित आहे.

फोंडा

कारण आतापर्यंत त्यांना फोंड्यावर शिक्का उमटवता आलेला नाही. याशिवाय मडकई मतदारसंघातही भाजपचे प्राबल्य वाढणार असल्याचा विश्‍वासही भाजप नेत्यांकडून व्यक्त होत आहे. कारण यापूर्वी रितेश नाईक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली असून बऱ्यापैकी मते मिळवली आहेत.
बहुजन समाजाचा आवाज म्हणून आमदार रवी नाईक यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच काँग्रेस पक्षासाठी निवडणुकीसाठी ते एक अस्त्र ठरले आहे. नेमके तेच अस्त्र काँग्रेसकडून भाजपने हिरावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता पिता काँग्रेसमध्ये, तर पुत्र भाजपमध्ये आणि एकाच घरातून दोन राष्ट्रीय पक्षांचे राजकारण चालणार आहे. रितेश नाईक यांनी यापूर्वी मडकई मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. रॉय नाईक यांनीही पालिका निवडणूक लढवली आहे आणि आता तर रितेश फोंडा पालिकेचे नगरसेवक आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात रितेश नाईक यांना फोंडा नगराध्यक्षपद बहाल केले, तरी त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. विद्यमान नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहकार्य केले. इतर नगरसेवकांचाही आपल्याला पाठिंबा मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्री काय सांगतील ते आपण मानणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कारभार चालवला आहे. विकासकामांचे नियोजन करताना विशेषतः गुंडगिरी मोडित काढण्यासाठी त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची पुनरावृत्ती झालेली दिसली नाही. बहुजन समाजाचा नेता म्हणूनही रवी नाईक यांच्याकडे पाहिले जाते, त्यामुळे राज्यातील भंडारी तसेच इतर समाजाची व्हॉटबॅंक रवी नाईक यांच्याकडे आहे. त्याचाच फायदा भाजप उठवू पाहत आहे. राज्यातील भाजप सरकारची आतापर्यंतची कामगिरी ही तेवढी समाधानकारक नाही. कोरोनाकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष, रुग्णांची चाललेली हेळसांड, अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे भाजपविषयी राज्यातील एका मोठ्या घटकात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्याचा फटका बसण्याचा धोकाही भाजपला आहे. त्याअनुषंगाने फोंडा तालुक्‍यात बहुजन समाजाची खास रवी नाईक आणि कॉंग्रेसकडे असलेली एकगठ्ठा मते मिळवण्याकडे भाजपचा कल असल्याचे स्पष्ट दिसत असल्याच्या राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
फोंड्यात काँग्रेसचे बस्थान हे आमदार रवी नाईक यांनी बसवले आहे. विशेषतः अल्पसंख्यकांची मते रवी नाईक अर्थातच कॉंग्रेसला हमखास मिळतात. ही मतेही खेचण्याचा भाजपचा इरादा असल्याचे स्पष्ट झाले असून ऐन विधानसभा निवडणुकीत इकडून तिकडे उड्या पडण्याची शक्‍यता असल्याने आताच भाजपने आपले धोरण निश्‍चित करून राजकीय नेत्यांच्या मुलांनाच उचलण्याचे प्रयत्न चालवले आहेत. सुरवातीला सत्तरीचे प्रतापसिंह राणे व त्यांचे पुत्र विश्‍वजित राणे यांच्याबाबतीत गणित जुळून आल्याने आता तेच तंत्र रवी नाईक व त्यांचे पुत्र रितेश आणि रॉय यांच्याबाबत भाजपने अवलंबले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

‘कही खुशी कही गम..!’
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रॉय आणि रितेश नाईक यांच्यामुळे सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये संभ्रमित वातावरण आहे. सत्तरीतील प्रतापसिंह राणे आणि विश्‍वजित राणे यांची री फोंड्यात रवी नाईक आणि रॉय व रितेशच्याबाबतीत ओढल्यामुळे दोन्ही पक्षात ‘कही खुशी कही गम’ असा प्रकार आहे. एकाच घरात राहून दोन विरोधी पक्षांचे राजकारण चालवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांतही संभ्रम आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी काय सांगतील ते योग्य अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसमध्ये जोपर्यंत रवी नाईक आहेत, तोपर्यंत कार्यकर्ते कॉंग्रेसला जवळ करतील, अन्यथा फोंड्यात कॉंग्रेसला भवितव्य कमीच असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.

आम्ही काँग्रेसमध्येच...!
फोंड्यातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून रवी नाईक निवडून आले आहेत. त्यामुळे ते आमचे नेते आहेत. रवी नाईक यांचे पुत्र जरी भाजपमध्ये गेले तरी आम्ही काँग्रेसमध्येच राहू. रवी नाईक यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. शेवटी फोंड्याचा विकास हा रवी नाईक यांनीच केला आहे.
- अरुण गुडेकर (काँग्रेस फोंडा गटाध्यक्ष)

फोंड्यात भाजप अधिक बळकट
रॉय आणि रितेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे फोंड्यात भाजप आणखी बळकट होणार आहे. आतापर्यंत फोंड्यात भाजपला विधानसभेत यश मिळाले नव्हते. फक्त मगो - भाजप युतीवेळी मगोचा उमेदवार निवडून आला होता, पण आता भाजपला अधिक संधी असून पक्षश्रेष्ठींचा निर्णय आम्हाला मान्य आहे.
- शांताराम कोलवेकर (भाजप, फोंडा गटाध्यक्ष)

आम्हाला फरक पडत नाही!
काँग्रेसचे रॉय आणि रितेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तरी आम्हाला काही फरक पडत नाही. बहुजन समाजाबरोबरच इतर सर्व लोक मगोच्या पाठीशी आहेत. त्यातच अल्पसंख्यकांचा यावेळेला पूर्ण पाठिंबा मगोला आहे. त्यामुळे मगो अधिकच ‘स्ट्राँग’ होईल.
- अनिल नाईक (मगो, फोंडा गटाध्यक्ष)

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या