खरी कुजबुज: आलेक्स रेजिनाल्ड यांनी घेतले तानावडेंचे आशीर्वाद

कुठलेही पद मिळाल्यावर पक्ष पुढाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.
खरी कुजबुज: आलेक्स रेजिनाल्ड यांनी घेतले तानावडेंचे आशीर्वाद
खरी कुजबुज.....Dainik Gomantak

गोवा: भाजपच्या कृपेने उद्योग विकास महामंडळ मिळाल्याने असेल कदाचित कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची ईडीसी कार्यालयात जाऊन भेट घेतली. तानावडे यांनी ट्विट करून या बातमीची माहिती दिली. एरव्ही जिंकून आल्यावर किंवा कुठलेही पद मिळाल्यावर पक्ष पुढाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. त्यानुसार भाजपच्या किती नवीन आमदारांनी ही प्रथा पाळली ते माहीत नाही, पण रेजिनाल्ड हे करण्यास चुकले नाहीत. भाजप आमदारांपेक्षा आपणच भाजपशी जास्त एकनिष्ठ हे दाखविण्याचा तर हा प्रयत्न नव्हता ना असे वाटल्याशिवाय राहिले नाही एव्हढे मात्र खरे.

खरी कुजबुज.....
विधिकारांना 365 दिवस काम बंधनकारक: रमेश तवडकर

अजून छापा कुठे पडला?

धेंपो आस्थापनावर छापा पडल्यानंतर गोव्यातील कॉंग्रेस नेते गेला आठवडाभर गप्प का आहेत याची प्रचिती लोकांना आली. सध्या मायकल लोबो घराबाहेर पडत नाहीत, असे खुद्द शिवोलीतील लोक बोलतात. सकाळी ते व्यायामाला मात्र जाऊन येतात. वास्तविक शपथविधी सोहळ्यावर झालेला सात कोटी खर्च, इंधन व गॅस दरवाढ, खाणींचा प्रश्न आदी विषय गाजत असतानाही अद्याप मायकल लोबो यांनी तोंड उघडलेले नाही.

ते केवळ एका जमीन वापरासंदर्भातील सरकारी कारवाईनंतर एवढे गप्पगार पडू शकतात, तर मग ईडीचा छापा पडल्यावर काय परिस्थिती होईल, असे आता लोक बोलू लागले आहेत. वास्तविक टीसीपी मंत्री विश्वजीत राणे यांनी लोबो यांच्याविरुद्ध केलेली ही कारवाई पाण्यावर तरंगणाऱ्या ‘हिमनगा’चा एक छोटासा भाग असल्याची चर्चा भाजपात सुरू आहे. गंमत म्हणजे लोबो यांची विरोधी नेतेपदी निवड झाल्यानंतर एका समाज कार्यकर्त्याने म्हटलेच होते, ‘ते तोंड मिटून बसले नाही म्हणजे झाले.’

गंगेत घोडे न्हाले

केंद्रीयमंत्री श्रीपाद भाऊंचे चिरंजीव सिद्धेश नाईक यांना अखेर निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष बनविण्यात आले. निवडणुकीत मागे सरल्याची ती बक्षिसी आहे. कुंभारजुवे मतदारसंघात अर्ज मागे घेतल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना योग्य ती भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय ते जिल्हा पंचायतीत बिनविरोध जिंकून येतील, हे ठरलेच होते. कारण तेथील पूर्वाश्रमीचे जि. प. अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांनी रोहन खंवटे यांच्या विरोधात काम केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली होती. तेव्हाच सिद्धेशला पुढे चाल मिळणार असल्याचे दिसले होतेच. शिवाय उत्तर गोवा जि. पंचायतीमध्ये भाजपचेच १८ सदस्य आहेत. शिवाय ओबीसी उमेदवार असल्याने त्यांच्या विरोधात कुणी उभे राहील, अशी शक्यताही नव्हती. याशिवाय वडिलांचे ‘‘कवच’’ होतेच की! ∙∙∙

तुम्हालाही धडा मिळेल बरे का!

ईडीने गोव्यात जरी एका खनिज निर्यातदारावर कंपनीवर छापा टाकण्याचे सोंग केले असले, तरी त्यांचे गोव्यावर सध्या बारीक लक्ष आहे, अशी चर्चा सुरू आहे. ज्या उद्योगपतींनी निवडणुकीत भाजपाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या ते त्यांच्या रडारवर असावेत. वास्तविक माहिती मिळते. त्यानुसार, ५० वर्षांची उपलब्धी नावाची पुस्तिका घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते व पियुष गोयल यांच्यासारखे मंत्री अनेक उद्योगपतींना भेटले होते. पणजीमध्ये माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्याबरोबर गोएल व किशन रेड्डी हेही काही उद्योगपतींना भेटून आले होते. परंतु तेथे त्यांनी केवळ गोडगोड बोलून त्यांना परत पाठवले होते. आता ज्यांच्यावर छापे पडणार आहेत, त्यांनी भाजपाला मदत केली नव्हती का? अशी चर्चा सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको. ∙∙∙

आता त्यांची खैर नाही!

धेंपो उद्योग समूहात छापे टाकणे याचा अर्थ गोव्यातील सध्या आक्रमक बनण्याचा पवित्रा घेतलेल्या इतर खनिज निर्यातदारांना इशारा तर नाही ना? एका बाजूला भाजप लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला गोव्यात खनिज लीजांचा लिलाव करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. परंतु काही खाणचालक सरकारच्या या हेतूला सुरूंग लावू पाहात असल्याचे लपून राहत नाही. सरकारला पुढच्या सहा महिन्यांत खनिज लीजांचा लिलाव करायचा आहे आणि त्यासाठी कोणतीही सबब चालणार नाही, असा इशारा केंद्राने राज्य सरकारला देऊन ठेवला आहे, असे असले तरी गोवा सरकार अत्यंत सावधपणे पावले टाकत आहे. खनिज निर्यातदारांकडून आपल्या सरकारला धोका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या निदर्शनास आणले असण्याची शक्यता आहे.

त्याचाच भाग म्हणून धेंपोंवर एक छोटासा छापा टाकण्यात आला. तो वास्तविक इतर प्रमुख निर्यातदारांना इशारा असू शकतो. दुसऱ्या बाजूला सरकारने आता लिलावाबाबत काही गंभीर कृती करणे भाग आहे. खाण खात्याकडे असे महत्त्वाचे निर्णय सोपवून चालणार नाहीत. सरकारला स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करून कायदेशीर सोपस्कार ताबडतोब सुरू करावे लागतील, असा सल्ला भाजपाच्या धुरीनांनी यापूर्वीच दिला आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात केविएट टाकून ठेवावा, असाही सल्ला देण्यात आला आहे. एका बाजूला गोवा सरकार सुस्त आणि हबकलेल्या स्थितीत असताना केंद्र मात्र गप्प बसलेले नाही, हे सध्याच्या केंद्राच्या पवित्र्यावरून दिसतेच आहे. ∙∙∙

राजकीय कनेक्शन?

पणजीत धेंपो आस्थापनावर पडलेला ईडीची छापा काल संपूर्ण गोव्यात हलचल निर्माण करणारा ठरला. हा छापा धेंपोंनी उत्पल पर्रीकरांना निवडणुकीत पाठिंबा दिल्यामुळे टाकण्यात आला, अशी अफवा काही सेकंदात गोवाभर पसरली. लोकांनी त्यात अमित शहा यांचेही नाव जोडले. अमित शहा यांच्याच अधिपत्याखाली ईडी असल्यामुळे उत्पलना दिलेला पाठिंबा दिल्लीला आवडला नाही.

त्याचा वचपा त्यांनी अशाप्रकारे काढला, अशी चर्चा गोव्यात सुरू झाली. परंतु संध्याकाळी सहा वाजल्याच्या आत ईडीने आपला गाशा गुंडाळला. ते धेंपोचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनाही भेटले नाहीत. त्यानंतर धेंपो कंपनीच्या एका माजी सरव्यवस्थापकाने केलेला हा घोटाळा होता, अशी माहिती बाहेर आली. परंतु तोपर्यंत धेंपोंवर पडलेला पहिलाच असा छापा ही चर्चा गोवाभर सुरू होती. ∙∙∙

म्हापशात भाजपला दणका!

प्रतिष्ठेचा विषय ठरलेल्या तथा बहुचर्चित अशा म्हापसा कोमुनिदादच्या निवडणुकीत मायकल कारास्को गटाचा पराभव झाल्याने एका परीने भाजपला तसेच स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा यांना दणका बसल्याची सध्या म्हापशात चर्चा आहे. वास्तविक, कारास्को यांनी काही महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता व त्यानंतर त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर ते तृणमूलच्या व्यासपीठावर कधी दिसलेच नाहीत. म्हापशातील तृणमूलचे उमेदवार तारक आरोलकर यांच्याऐवजी भाजपचे ज्योशुआ डिसोझा यांच्यासाठी त्यांनी काम केले होते हे तर सर्वश्रुतच आहे.

त्यामुळेच राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांच्या कृपेने गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाली होती. कारास्को अधिकृतपणे भाजपमध्ये नसले तरी त्यांना कोमुनिदादवर निवडून आणण्याचे तसेच सरकार पातळीवरील एखादे पद देण्याचे आश्वासन भाजपने व स्थानिक आमदाराने दिले होते, असा सध्या म्हापशात बोलबाला आहे. ∙∙∙

खरी कुजबुज.....
‘गोंयचो एकवोट’कडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

बाबूंचा वाढदिवस झोकात

माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा विधानसभा निवडणुकीत केपे मतदारसंघात पराभव झाला, तरी त्यांची लोकप्रियता अजून कायम आहे. याचा प्रत्यय शनिवारी त्यांच्या वाढदिनी आला. आपल्या वाढदिवशी बाबूंनी नेहमीप्रमाणे सत्यनारायण महापूजा ठेवली होती. बाबूंचे अभिष्टचिंतन करण्यासाठी तसेच पूजेचा महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी बाबूंच्या बेतुल येथील निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी पडली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, भाजपचे आयोजन सचिव सतीश धोंड आदींनी बाबूंच्या घरी येऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्यामुळे बाबूंचा लोकसंपर्क अजूनही पूर्वीप्रमाणेच असल्याचेही स्पष्ट झालेच. ∙∙∙

ये रे माझ्या मागल्या

बांबोळी येथील गोमेकॉबाहेरील हटविलेल्या विक्रेत्यांनी पुन्हा त्याच जागी आपला व्यवसाय पूर्ववत सुरू केल्यामुळे व त्यांच्याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या पाठीमागे कोणता गॉडफादर उभा ठाकला आहे अशी चर्चा गोमेकॉत येणारी मंडळी करू लागली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांना हटविले गेल्याचे प्रथम सांगितले गेले होते, मग आता न्यायालयीन आदेशाचा अवमान होत नाही का? अशी पृच्छाही होत आहे. त्यातही मजेची बाब म्हणजे हटविलेल्यांच्या पुनर्वसनासाठी गाळे बांधून तयार आहेत, पण त्यांचे वाटपात विलंब होत असल्याने हा घोळ सुरू आहे. ∙∙∙

काँग्रेस आयआयटी समर्थक?

काणकोण, सांगे व नंतर मेळावली येथे आयआयटीला विरोध केलेल्या काँग्रेसने केपेत या राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या संस्थेला पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर काही काँग्रेसवाले ही भूमिका काँग्रेसची नाही तर तेथील आमदार एल्टन डिकॉस्टा यांची असल्याचे सांगून आपण नामानिराळे रहात आहेत. प्रत्यक्षात केपेत आयआयटी नेण्याचा सध्या तरी कोणताच प्रस्ताव नसताना एल्टन यांनी विनाकारण हा प्रश्न उकरून काढल्याचे काहीजण मानतात.

यापूर्वी लोलये पठारावर या प्रकल्पाची सर्व तयारी झालेली असताना काँग्रेसने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारने बेत बदलला होता. गेली पाच ते सहा वर्षे या प्रकल्पाला जागा निश्चित होऊ शकली नाही व त्याचे खापर काँग्रेसवर फोडले जाऊ लागल्याने आता त्या पक्षाला ही उपरती तर झालेली नसावी ना असे सवालही केले जाऊ लागले आहेत.

खाणींचे काय होणार?

राज्यातील खाणी आता खाणमालकांकडून काढून घेण्यात येणार असून सध्या तरी तसे नोटिशीवरून दिसून येत आहे. खाणमालकांना खाणी खाली करण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात काहीही होऊ शकते, अशा प्रतिक्रिया खाण अवलंबितांत व्यक्त होत आहे.

याचे कारण म्हणजे पूर्वीच्या काळी आणि कदाचित आताही राज्यात सरकार कुणाचे असावे हे म्हणे खाणमालक ठरवत असत. प्रचंड पैसा असल्यामुळे खाण लॉबी पॉवरफूल झाली होती आणि सत्तेची इकडून तिकडे उलथापालथ हे खाण माफीया सहज करीत होते. आताही सरकारने नोटीस बजावली आहे खरी, पण पुढे काय होईल सांगता यायचे नाही, ते याच कारणामुळे. म्हणूनच तर खाण अवलंबितांत यासंबंधी जोरदार चर्चा आहे.

बाबूंचे वलय कायम!

‘मोडलेल्या खुर्साक कोण चेपें काढीना’ ही कोकणी म्हण माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी खोटी ठरवली. शनिवारी बाबू कवळेकर यांचा वाढदिवस होता. तसे बाबू पूर्वीपासूनच वाढदिनी सत्यनारायण पूजतात व समर्थकांना, हितचिंतकांना आपल्या घरीच भेटतात. यंदाचा वाढदिन बाबूंसाठी वेगळा व खास होता.

माजी आमदार म्हणून त्यांचा पहिला वाढदिवस. मात्र, बाबूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेला समर्थकांचा महापूर पाहून अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. माजी आमदार असतानाही यंदा बाबूंनी पूर्वीचे सर्व रिकोर्ड ब्रेक केले. आमदार असताना जेवढे लोक असायचे त्यापेक्षा ज्यास्त लोक यंदा होते. मुख्यमंत्री, मंत्री, प्रदेशाध्यक्ष सदानद शेट तानावडे, आमदार, संघटनमंत्री धोंड यांच्यासह हजारो बाबूंच्या समर्थकांनी त्यांच्या घरी गर्दी करून बाबू अजून सक्रिय आहे हे दाखवून दिले. निवडणूक हरलो तरी बाबू ‘बाबू’ आहे हे बाबूंनी मात्र स्पष्ट केले.

रेजिनाल्डला फोटोची ॲलर्जी?

जे पोटात आहे ते ओठांवर येतेच असे नव्हे, काही लोक पोटातील गोष्टी पोटातच ठेवतात. गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष रेजिनाल्ड लॉरेन्स हे जरी अपक्ष आमदार असले तरी भाजप समर्थक हे सगळ्यांनाच माहीत आहे.

रेजिनाल्डची जरी भाजपशी सलगी असली तरी ती सलगी ते आपल्या मतदारांना व गोमंतकीय जनतेपासून लपवायला पाहतात असे दिसते. रेजिनाल्ड न चुकता भाजपा आमदार व मंत्र्यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. मात्र भाजपा नेत्यांबरोबर ते फोटोफ्रेममध्ये यायला कचरतात. परवा बाबू कवळेकर यांच्या वाढदिनी बाबू, सदानंद तानावडे व सतीश धोंड रेनिनाल्ड बरोबर केक कापून ग्रुप फोटो सेशनसाठी थांबले. मात्र, रेजिनाल्ड फोटोफ्रेममध्ये येणार म्हणून हळूच बाजुला सटकले. सदानंद शेट तानावडे यांच्याबरोबर मात्र त्यांनी एक फोटो घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.