राज्यातील बोटमालक डिझेल सबसिडीच्या प्रतीक्षेत

वार्ताहर
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

मागील दहा महिन्यांची बिले मंजूर, पण रक्कम मिळाली नसल्याने बोटमालक नाराज

नावेली: गोव्यातील सर्व बोटमालकांना मच्छीमार खात्यामार्फत देण्यात येणारी डिझेल सबसिडी गेल्या दोन वर्षांपासून न मिळाल्याने बोटमालकांना आपल्याला सबसिडी कधी मिळणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

एका बोटमालकाला केवळ दोनच बोटीवर ही सबसिडी दिली जाते. डिझेलच्या किंमतीत दरवाढ होत असल्याने बोटमालकाना डिझेल परवडत नाही. त्यामुळे डिझेलवर लागू करण्यात आलेल्या वॅटच्या माध्यमातून ही सबसिडी दिली जात आहे. ही सबसिडी गोव्यातच नाही, तर ज्या अन्य राज्यात मासेमारी व्यवसाय केला जातो त्या राज्यात लागू आहे. यासाठी ३० हजार लिटर, २० हजार लिटर व १५ हजार लिटरवर ही सबसिडी दिली जात आहे.

यासाठी बोटमालकांना दर तीन महिन्यांनी किती डिझेल खरेदी करण्यात आले याचा अहवाल व बिले मच्छीमार सोसायटीच्या कार्यालयात जमा करावी लागतात, अशी माहिती अखिल गोवा पर्सिंग ट्रॉलरमालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी दिली. आम्हाला मागच्या दहा महिन्यांची डिझेल सबसिडीची बिले मंजूर करण्यात आली असल्याची माहिती मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे, परंतु रक्कम खात्यात अद्याप जमा करण्यात आलेली नाही, असे धोंड यांनी सांगितले.
कुटबण ट्रॉलरमालक संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी कुटबण जेटीवरी बोटमालकांनाही अद्याप डिझेल सबसिडी मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ट्रॉलरमालकांनी त्यांना डिझेल सबसिडी अद्याप न मिळाल्याने त्यांनी डिझेलची बिले देणेच बंद केले, असे डिसिल्वा यांनी सांगितले.

मालिम येथील बोटमालक सीताकांत परब यांनी बोटमालकांना सरकारकडून देण्यात येणारी सबसिडी बोटमालकाना वेळेवर मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मच्छिमार खात्याच्या संचालिका डॉ. शमीला मोंतेरो यांनी सरकारकडून बोटमालकांना डिझेलवर वॅट स्वरूपात सबसिडी दिली जात आहे.  वित्त खात्यामार्फत आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतर बोटमालकांना सबसिडीची रक्कम दिली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

बर्फऐवजी मासळी साठवून ठेवणे अशक्य
गोव्यात सध्या पांढरे पापलेट, पांढरी सुंगटे मोठ्या प्रमाणात जाळ्यात गवसत असून ती साठवून ठेवण्यासाठी गोव्यात बर्फ उपलब्ध नसल्यामुळे ही मासळी त्याच दिवशी रात्रीच्यावेळी शेजारील राज्यात पाठवून दिली जात आहे. गोव्यात अनेक ठिकाणी आईस प्लांट बंद असल्याची माहिती घाऊक मासळी विक्रेत्यांकडून प्राप्त झाली आहे. मासळी साठवून ठेवण्यासाठी बर्फ उपलब्ध नसल्याने मासळी साठवून ठेवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या