मडगाव बॉम्बस्फोट : सनातनच्या ६ सदस्यांची निर्दोष मुक्तता

मडगाव बॉम्बस्फोट : सनातनच्या ६ सदस्यांची निर्दोष मुक्तता
मडगाव बॉम्बस्फोट : सनातनच्या ६ सदस्यांची निर्दोष मुक्तता

पणजी: मडगाव येथे दहा वर्षांपूर्वी दिवाळीच्या आदल्यारात्री झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातून सहा संशयित आरोपींची आज मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या संशयित आरोपींची यापूर्वी खास न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज उच्च न्यायालयाने ३६ पानी निवाडा दिला.

मडगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील संशयित विनय तळेकर, विनायक पाटील, धनंजय अष्टेकर, दिलीप मालेगावकर, प्रशांत अष्टेकर आणि प्रशांत जुवेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. न्या. एम. एस. सोनक आणि न्या. एम. एस. जवळकर यांच्या खंडपीठाने आज हा निवाडा दिला. मडगाव येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला १६ ऑक्टोबर २००९ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान हा बॉम्बस्फोट झाला होता. विशेष न्यायालयाने ३१ डिसेंबर  २०१३ रोजी यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

मडगावला जीए ०५, ए ७८०० या क्रमाकांच्या स्कूटरच्या डिकीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याचे त्यावेळी दिसून आले होते. तसा उल्लेखही निवाड्यात करण्यात आला आहे. मडगाव येथे नरकासुर स्पर्धा सुरू असताना तेथून ४०० मीटर अंतरावर हा प्रकार घडला होता. त्याचदिवशी सांकवाळ येथे रात्री साडेदहा वाजता एका बेवारस पिशवीत स्फोटके सापडली होती. ९ डिसेंबर २००९ रोजी या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला होता. खटल्यादरम्यान १२२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.

दिवाळीच्या पूर्व रात्री १६ ऑक्‍टोबर२००९ रोजी मडगाव येथे ग्रेस चर्चजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटातील सर्व सहाही संशयित आरोपींची केंद्रीय गुप्तचर विभाग गोवा न्यायालयाचे खास न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी सबळ, विश्‍वसनीय पुराव्याअभावी सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती. त्याला आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयात याविषयीचा खटला प्रलंबित होता. अखेर ॲडिनशल सॉलिसिटर जनरल ॲड. प्रवीण फळदेसाई यांनी याचिकादार राष्ट्रीय तपास यंत्रणेच्यावतीने युक्तिवाद केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने खास न्यायालयाचा निवाडा कायम ठेवला. उच्च न्यायालयाने ३६ पानी निवाडा दिला आहे. खास न्यायालयाने १७५ पानी निकालपत्र दिले होते.

या बॉम्बस्फोटाची चौकशी एनआयएने (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) केली होती. या स्फोटात मालगोंडा पाटील व योगेश नाईक ठार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी विनय तळेकर, विनायक पाटील, धनंजय अष्टेकर, दिलीप माणगावकर, प्रशांत अष्टेकर व प्रशांत जुवेकर या सहाजणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा १९६७ च्या कलम १६,१८ व२३, स्फोटक द्रव्ये कायदा १९०८ च्या कलम ३, ४ व ५ तसेच भारतीय दंड संहितेच्या १२०(ब) व १२१  कलमाखाली गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील जयप्रकाश ऊर्फ अण्णा, रूद्रा पाटील, सारंग कुलकर्णी व प्रवीण लिमकर हे संशयित अद्याप फरारी आहेत.

सहा संशयित आरोपींविरुद्ध फिर्यादी पक्षाने न्यायालयात उभा केलेला खटला १२ परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. परंतु हे परिस्थितीजन्य पुरावे संशयित दोषी ठरविण्याइतके सबळ विश्‍वसनीय पुरावे नव्हते, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे होते. त्यापैकी दोन पुरावे हे संशयितांना शिक्षा देण्याएवढे सक्षम नसले तरी त्यात जराही तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

या प्रकरणाच्या प्रथम माहिती अहवालात नमूद करण्यात आलेल्या काही गोष्टी संशयास्पद आहेत. या प्रकरणातील वस्तुस्थितीच्या बाबतीतही हात चलाखी करण्यात आल्याचे दिसते. ता. २६, २७, व २८ ऑगस्ट २००९ रोजी तळावली येथे करण्यात आलेल्या परीक्षण बॉम्ब स्फोटात वापरलेली स्फोटके, द्रव्ये व मडगाव येथे झालेल्या  बॉम्ब स्फोटात वापरलेली स्फोटके वेगळी होती. त्यांच्यात साम्य नव्हते. सांकवाळ येथे विनय तळेकर व धनंजय अष्टेकर यांनी ट्रकमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. पुरावा म्हणून सादर करण्यात आलेले हस्ताक्षर धनंजय अष्टेकरच्या हस्ताक्षरांशी जुळत नाही. या गोष्टी न्यायालयाने निकालपत्रात नमूद करून संशयितांची निर्दोष सुटका केली होती. उच्च न्यायालयाने प्रथम माहिती अहवालात माहिती नोंदवताना चलाखी करण्यात आल्याचे निवाड्यात नाकारले आहे. संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रात हे बॉम्बस्फोट प्रकरण गाजले होते. या प्रकरणाचा संबंध कथित हिंदू दहशतवादाशीही लावण्यात आला होता.

त्या दिवशी मडगावात काय घडले होते?
मडगावात १६ ऑक्‍टोबर २००९ला पालिका चौकात नरकासुर प्रतिमा स्पर्धा सुरू असताना ग्रेस चर्चच्या मागे "रिलायन्स ट्रेड सेंटर'' जवळच्या जे अँड एन बुटिकसमोर (रेडिमेड गारमेंट) रात्री साडेनऊ वाजता बॉम्बस्फोट झाल्याचा प्रचंड आवाज कानावर पडल्यामुळे सर्वत्र गोंधळ झाला. दुकानासमोर दोघे पंचविशीतले युवक रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होते. स्कूटर त्यांच्यावर पडली होती. बाजूला एक मोटारसायकल व कारगाडी उभी होती. शेजारी अनेक वाहने रांगेत उभी करून ठेवण्यात आली होती.

`सनातन`चे म्हणणे
मडगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या ६ साधकांना गोवण्याचा प्रयत्न गोव्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारने केला होता. चार वर्षे अकारण कारावास भोगल्यानंतर सत्र न्यायालयाने सनातनच्या या सर्व साधकांना निर्दोष मुक्त केले होते. याविषयीच्या अपिलावर सुनावणी करतांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आम्ही न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करतो. या निकालामुळे सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भगव्या दहशतवादाचे मिथक प्रचारित करणाऱ्यांसाठी ही सणसणीत चपराक आहे
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com