पुस्तकांमुळे जीवन समृध्द बनते : नारायणदेव राऊत

प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

दाडाचीवाडी धारगळ वाचनालयात ग्रंथालयदिन उत्साहात

पेडणे: विविध पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्याला चांगले ज्ञान मिळते. वाचनांमुळे जीवन समृद्ध बनते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी त्यांना वाचनालयांचा आधार मिळतो. ग्रामीण भागातील लोकांसाठी वाचनालये उपयुक्त ठरत आहेत. श्री साईबाबा स्वामी समर्थ वाचनालयामुळे या भागात वाचकांची चांगली सोय झाली आहे, असे उद्‍गार समाज कार्यकर्ते नारायणदेव राऊत यांनी काढले.

दाडाचीवाडी धारगळ येथील श्री साईबाबा स्वामीसमर्थ वाचनालयात आयोजित ग्रंथालयदिन कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी डॉ. रमेश परोब, वाचनालय संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाडलोसकर, प्रसाद पाडलोसकर, एकनाथ गडेकर, मांद्रेचे माजी सरपंच बाबुसो हडफडकर, सौ. तारा हडफडकर, विश्‍वनाथ नाईक, महेश तांडेल आदी उपस्थित होते.

डॉ. रमेश परोब यांनी ग्रंथ हे आपले मित्र आहेत. पुस्तकांमुळे आपल्या आयुष्यात चांगला बदल घडू शकतो. आपल्यावर चांगली पुस्तके सुसंस्कार करतात. म्हणून प्रत्येकाने पुस्तक वाचण्याची आवड जपायला हवी, असे सांगितले. या वाचनालयात अनेकविध माहितीपूर्ण पुस्तके आणि वर्तमानपत्रे उपलब्ध असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सुधाकर पाडलोसकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात वाचनालयातील ग्रंथसंपदेची माहिती उपस्थितांना दिली. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा पुस्तकांना वाचनालयात प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ लोकांसाठी हे वाचनालय एक आधार ठरला आहे. आपला वेळ वाचनात घालवताना त्यांना आनंद मिळत असल्याचे ज्येष्ठ लोक सांगतात तेव्हा, वाचनालयाचे चीज झाल्याचे वाटते, असे पाडलोसकर म्हणाले. 

सुरवातीला नारायणदेव राऊत यांच्या हस्ते कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलित करून करण्यात आला. विश्‍वनाथ नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद पाडलोसकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या