पेडणेच्या संमेलनातील 'पुनव'!

या संमेलनाने स्मरणिकेच्या मजकुराचा जो साचा आणि आकार तयार झाला, तो जवळ-जवळ आजही पाळला जातो.
पेडणेच्या संमेलनातील 'पुनव'!
MoonDainik Gomantak

ग्रंथ म्हणावा तर ग्रंथ नाही, (Moon) नियतकालिक म्हणावं तर नियतकालिक नाही अशा आमुरपिक्या अवस्थेतील साहित्य प्रकार म्हणजे स्मरणिका. संस्थांच्या विशेष समारंभांची किंवा विशेष गौरवांची आठवण म्हणून या स्मरणिका वा गौरविका प्रसिद्ध केल्या जातात. त्यासाठी आयोजकांकडून खूप कष्ट घेतले जातात. स्मरणिका आकर्षत व्हाव्यात म्हणून छपाईवर सढळ हस्ते खर्चही केला जातो. उत्साहाने त्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित पण केल्या जातात.

स्मरणिका हा गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचा महत्त्वाचा वाङमयीन घटक आहे. 1928 साली स्थापन झालेल्या गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे पहिले साहित्य संमेलन मडगाव (Madgaon) येथे झाले पण त्यावेळी स्मरणिका निघाली नाही. 1945 ते 1960 पर्यंतची संमेलने पोर्तुगीजांच्या जाचामुळे गोव्याबाहेर भरवावी लागली. त्यात 1960 साली लोणावळा येथे भरलेल्या साहित्य संमेलनात, संमेलन चळवळीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून एक विशेष स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली. 1975 साली वास्को येथे भरवण्यात आलेल्या 14 व्या साहित्य संमेलनाने स्मरणिकेची प्रथा रूढ झाली. त्यानंतर ही प्रथा मात्र आजवर पाळली गेली आहे. या संमेलनाने स्मरणिकेच्या मजकुराचा जो साचा आणि आकार तयार झाला, तो जवळ-जवळ आजही पाळला जातो.

Moon
कर्नाटकातील मासेमारी ट्रॉलरना काणकोणातील मच्छीमारांनी हाकलले

संमेलनाध्यक्षांचे तसेच स्वागताध्यक्षाचे भाषण, त्यांची छायाचित्रे, सुवर्णपदक (Gold medal) विजेत्यांचा परिचय, गोमंतक साहित्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेणारा लेख, कार्यक्रम पत्रिका मंडळाचे तसेच स्वागत समितीचे पदाधिकारी यांची छायाचित्रे, वेगवेगळ्या गोमंतकीय मराठी वाङमयप्रकाराचा चिकित्सक आढावा घेणारे तसेच स्थलविशेष दाखवणारे अभ्यासकांचे लेख असे स्मरणिकेचे ढोबळमानाने अंतरंग स्वरूप असते.

स्मरणिका हे बहुमूल्य असं अक्षरधन नसले तरी त्यात संमेलनाच्या आठवणी जतन करून ठेवल्या जातात. प्रत्येक संमेलनाची स्मरणिका संग्राह्य व्हावी, तिला वाङमयमूल्य प्राप्त व्हावे आणि पूर्वसुरीनी घालून दिलेल्या स्मरणिकाविषयक परंपरांचे पालन व्हावे असा आयोजकांचा कटाक्ष असतो.

स्मरणिकेला अन्वर्थक नाव देण्याची परंपरा....

डिचोली (Bicholim) येथे 1980 मध्ये झालेल्या सोळाव्या साहित्य संमेलनापासून स्मरणिकेला अन्वर्थक शीर्षक देण्याची प्रथा सुरू झाली. स्मरणिका समितीचे निमंत्रक, कथाकार यशवंत कर्णिक यांनी ती सुरू केली. ‘शब्दब्रह्म’ हे त्या स्मरणिकेचे नाव होते. त्यानंतर दिंडी (मंगेशी), वाळवंटी (साखळी), जागर (वळवई- 1995) पालखी (मडगाव 1996), तोरण (होंडा 1998), चंद्रवाडी (केपे 2001), रजत रसाचे चांदणे (पणजी- 2004) रसगंधा (म्हापसा- 2006) मालिनी पौर्णिमा (माशेल- 2009) इत्यादी.

गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सुवर्ण महोत्सव व हीरक महोत्सव प्रसंगी प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेचे नावे होती, ‘सुवर्ण स्मृती’ आणि ‘हीरक स्मृती’ तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या संदर्भ ग्रंथाचे नाव होते ‘अमृतानुभव’. यंदा पेडणे येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेचे नाव आहे ‘पुनव’.

- नारायण महाले

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com