राष्ट्रीयीकृत बॅंकेची डिचोलीतील ‘ती’ शाखा बंदच

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

शनिवारपासून व्यवहार ठप्प, ग्राहकांची गैरसोय

डिचोली:  कोरोना महामारी संसर्गाने शिरकाव केलेल्या डिचोलीतील ‘त्या’ राष्ट्रीयीकृत बॅंकेची शाखा आजही (मंगळवारी) बंद राहिली. शहरातील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेत काही कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर मागील शनिवारपासून ही शाखा बंद ठेवण्यात आली आहे. तशी
 नोटीसही बॅंकेच्या शटरवर चिकटवण्यात आली. काल सोमवारपर्यंत ही बॅंक बंद राहणार आणि आज मंगळवारपासून पूर्ववत सुरू होणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मात्र, आजही बॅंकेच्या शाखेतील व्यवहार सुरू झाले नाहीत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी वा अन्य व्यवहारानिमित्त बॅंकेत आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मंगळवारी बॅंक बंद राहिली असली, तरी महिला मिळून चार-पाच कर्मचारी सकाळी बॅंकेत आले. शटर अर्धवट अवस्थेत बंद ठेवून हे कर्मचारी आत गेले.

 मात्र, एकाही ग्राहकाला बॅंकेत आत प्रवेश देण्यात आला नाही. तासाभराने साधारण सकाळी साडे अकरा वाजता हे कर्मचारी बॅंकेबाहेर आले आणि शटरला कुलूप लावून निघून गेले. बॅंक सुरु होणार म्हणून काही ग्राहक बॅंकेबाहेर प्रतीक्षेत होते.

संबंधित बातम्या