स्थानिक वस्तूंनाच ब्रँड करा : मुख्यमंत्री

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

स्वयंपूर्ण गोव्यासाठी सर्वांनीच ‘व्होकल फॉर लोकल’ धोरण स्वीकारायला हवे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

पणजी:  वापरण्यासाठी दुसऱ्या राज्यातील शाल आपण आणतो. मात्र, गोव्याची ओळख असणाऱ्या कुणबी साडीच्या माध्यमातूनसुद्धा आपण शालसारख्या गोष्टी विकसित करू शकतो. आतापर्यंत बाहेरील लोक गोव्यात येऊन व्यवसाय करीत होते, मात्र आता आपली ओळख असणाऱ्या स्थानिक वस्तूंचाच आपण ब्रँड केला पाहिजे. स्वयंपूर्ण गोव्यासाठी सर्वांनीच ‘व्होकल फॉर लोकल’ धोरण स्वीकारायला हवे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

गो वूमनिया या व्यासपीठासोबत एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आणि विविध क्षेत्रातील उद्योजिका असणाऱ्या राज्यातील ११ हजार चारशे महिलांनी एकत्रित येत ‘गोयंकार्ट’ या मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती केली. हे ॲप त्यांच्या व्यवसायाला सत्यात उतरण्यासाठीचे बळ देणार आहे. या ॲपच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर डॉ. स्नेहा भागवत, सिया शेख, मोक्षा खेतान आदी उपस्थित होते. 

११ हजारपेक्षा अधिक उद्योजक बहिणी अशा व्यासपीठावर एकत्रित आल्या आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. आता आपण सर्वांनी मिळून गोव्यातील वस्तूंची ओळख ‘मेड इन गोवा’ अशी होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. राज्यातील ‘स्टार्टअप’ योजनांचाही त्यांनी लाभ घ्यावा. उद्योग आधार कार्डचाही लाभ त्या घेऊ शकतात. शिवाय त्यांच्याकरवी आयोजित करणाऱ्या कार्यशाळा, प्रशिक्षण उपक्रम आणि इतर खरेदी उत्सवांना मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे कार्य आम्ही करू. पंचायत सभागृहे, बंद पडलेल्या प्राथमिक शाळा तसेच सार्वजनिक सभागृहांचा वापर या सत्कार्यासाठी नक्कीच होऊ शकत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करा. यासंदर्भात मदतीसाठी गोवा हस्तकला महामंडळ आहेच. सरकारकडून हवी ती मदत आम्ही देऊ. शिवाय काही चांगल्या विनाशासकीय संस्थाही पुढे येऊन मदत करतात, असे मुख्यमंत्री 
म्हणाले. 

मी अगदी लहान स्वरूपात गो वुमनियाची सुरवात केली होती. मात्र, आता या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. आम्ही इतक्याजणी या एका व्यासपीठावर जोडल्या गेल्या आहोत. ज्यामुळे प्रत्येकजण एकमेकींच्या व्यवसायाला वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जर आपल्याला समाजात बदल पहायचा असेल, तर तो स्वतःपासूनच सुरू करायला हवा, असे सिया शेख यावेळी म्हणाल्या. 

आम्ही जेव्हा स्वतःच्या पायावर खऱ्या अर्थाने उभ्या राहू त्याच दिवशी आत्मनिर्भर होऊ असे म्हणता येईल.  गोयंकार्टच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय डिजिटली वाढविता येणार आहे. आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात असतो. आपण गोयंकार्ट ॲपला प्रत्येकापर्यंत पोहचवून दिवाळीची खरेदी गोयंकार्ट ॲपवरून प्रत्येक गोवेकराने करावी, असे आवाहन करूया, असे डॉ. भागवत म्हणाल्या. स्वागत मधुमती देवी यांनी केली. नेहा सनक्के यांनी नृत्याविष्कार सादर केला.

संबंधित बातम्या