सर्जनशील उपक्रमांच्या आयोजनातील ब्रॅण्ड : ‘अभिनव क्रिएशन्स’

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्जनशील उपक्रमांचे आयोजन हे सहसा अर्थप्राप्तीचे, उदरनिर्वाहाचे साधन होऊ शकत नाही, असा सार्वत्रिक समज आहे.

मडगाव: सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्जनशील उपक्रमांचे आयोजन हे सहसा अर्थप्राप्तीचे, उदरनिर्वाहाचे साधन होऊ शकत नाही, असा सार्वत्रिक समज आहे. पण, सर्जनशील उपक्रम व व्यावसायिक यशाची यशस्वी सांगड घालून अन्वेषा सिंगबाळ व अमोल कामत यांनी हा समज खोटा ठरवला आहे. पाच वर्षांपूर्वी स्टार्ट-अप घेऊन वेगळी वाट चोखाळलेल्या या दोघां धडपड्या कार्यकर्त्यांच्या अभिनव क्रियेशन्स व मज्जा स्कूल ऑफ जॉय संस्था आज सर्जनशील उपक्रमाच्या क्षेत्रात गोव्यातील ब्रॅण्ड बनल्या आहेत. 

साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या अन्वेषा सिंगबाळ व अमोल कामत यांनी पाच वर्षांपूर्वी अभिनव क्रिएशन्सची मुहर्तमेढ रोवली. ज्या क्षेत्रात वावरतो त्याच क्षेत्रात करीअर करायचे या धारणेतून ती दोघे एकत्र आली. पुस्तक प्रदर्शनांच्या आयोजनापासून त्यांनी प्रवास सुरू केला. त्यात विविध उपक्रमांची जोड देत वैविध्य आणले आणि आज मुलांसाठीच्या सर्जनशील उपक्रमांच्या आयोजनात गोव्यातील एक उत्कृष्ट संस्था असा लौकीक मिळवला. 

त्यांची अभिनव क्रिएशन्स व मज्जा स्कूल ऑफ जॉय या संस्था मुलांसाठी चित्रकला, कविता, कथा कथन, नाटक, नृत्य, हस्तकला विषयांवर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करतात. अलिकडेच त्यात विज्ञान व माती कला विषय जोडण्यात आले आहे. कल्पक व व्यावसायिक पद्धतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांना मुलांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुलांमध्ये कौशल्य गुणांचा व एकूणच व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यात ही शिबिरे उपयुक्त ठरत असल्याने पालकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सिंगबाळ यांनी सांगितले. 

आपल्याला आवडणारी गोष्टच आपला व्यवसाय असावा या सारखे मनाला आनंद देणारे दुसरे काही नाही. हे जाणूनच अमोल कामत व मी हा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला आम्ही पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करू लागलो तेव्हा हा उपक्रम फायदेशीर ठरणार नाही, असे सांगून अनेकांनी आम्हाला निरुत्साही केले. पण, आम्हाला विश्वास होता व अनेकांची साथही आम्हाला लाभली, असे सिंगबाळ यांनी सांगितले. 

या उपक्रमांमध्ये पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने मार्गदर्शन कऱण्यात येते. आमचे काही सहकाऱ्यांकडून आम्हाला या कामासाठी साथ मिळते. कल्पक व व्यावसायिक पद्धतीने आमच्या उपक्रमातून मुलांना कला कौशल्ये शिकवली जातात, अशी माहिती सिंगबाळ यांनी दिली. 

कोविड काळातही आम्ही  इंग्रजी संभाषण व संवाद कौशल्या, कोकणी संभाषण प्रशिक्षण विषयांवर ऑनलाईन शिबिरांचे आयोजन केले. या दोन्ही उपक्रमांनाही बराच प्रतिसाद लाभला. चक्क कॅलिफोर्निया (अमेरिका) व फ्रान्स येथूनही या उपक्रमांना प्रतिसाद मिळाला, असे सिंगबाळ यांनी सांगितले. 

सध्या कोविड स्थितीमुळे मर्यादा आली आहे. पण, स्थितीत सुधारणा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे उपक्रम सुरु होतील व त्यात आणखी नवीन उपक्रमांचीही भर घालून विस्तार करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

या उपक्रमासाठी सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत घेतलेली नाही. व्यावसायिकदऋष्ट्या सध्या आम्ही बऱ्यापैकी यशस्वी आहोत. आवडणाऱ्या क्षेत्रातच व्यावसायिक मिळत असलेले यश समाधान देणारे आहे, असे सिंगबाळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या