लाचखोर हनुमंत गोवेकरला अखेर जामीन 

विलास महाडिक
शुक्रवार, 31 जुलै 2020

सरकारी ज्येष्ठ वकील एस. रिवणकर यांनी बाजू मांडताना सांगितले की, तपास यंत्रणेने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व साक्षीदारांच्या जबान्या नोंद केल्या आहेत त्यामुळे त्याला जामीन दिल्यास तपास यंत्रणेचे हरकत नाही मात्र त्याला अटी घालण्यात याव्यात.

पणजी

हणजूण येथील एका व्यावसायिकाकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या हणजुणे पंच सदस्य संशयित हनुमंत गोवेकर याला आज अखेर एका महिन्यानंतर सशर्त जामीन मिळाला. इतर दोन संशियत साथीदारांना काही दिवसांतच जामीन मिळाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याला सशर्त जामीन देताना गोव्याबाहेर न जाण्याची अट घातली आहे. 
संशयित हनुमंत गोवेकर याला २७ जून २०२० रोजी व्यावसायिकाकडून एक लाखाची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग  (एसीबी) पथकाने अटक केली होती. तेव्हापासून तो पोलिस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत होता. कोठडीत असताना जामिनासाठी त्याने अर्ज सत्र न्यायालयात केला होता मात्र तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. दरम्यान या प्रकरणात संशयित गोवेकर याच्यासह पंचसदस्य सुरेंद्र गोवेकर व शीतल दाभोळकर याचीही नावे तक्रारीत होती. त्यामुळे पथकाने सुरेंद्र गोवेकर याला त्याच रात्री घरावर पाळत ठेवून अटक केली होती. संशयित शीतल दाभोळकर मात्र फरारी झाली होती व तपास यंत्रणा तिचा शोध घेत होते. सुरेंद्र गोवेकर याला जामीन मिळाला मात्र हनुमंत गोवेकर याला जामीन नामंजूर झाला होता. शीतल हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. कारवाईच्यावेळी तिची उपस्थिती नसल्याने न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. 
दरम्यान, संशयित हनुमंत गोवेकर याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयासमोर आला असता सरकारी ज्येष्ठ वकील एस. रिवणकर यांनी बाजू मांडताना सांगितले की, तपास यंत्रणेने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व साक्षीदारांच्या जबान्या नोंद केल्या आहेत त्यामुळे त्याला जामीन दिल्यास तपास यंत्रणेचे हरकत नाही मात्र त्याला अटी घालण्यात याव्यात. न्यायालयाने संशयिताला वैयक्तिक ५० हजारांची हमी तसेच तत्सम रक्कमेचा एक हमीदार देण्याचे त्याचबरोबर न्यायालयात खटला सुरू होईपर्यंत साक्षीदाराशी संपर्क साधण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न करू नये अशा अटी घातल्या आहेत. 

संबंधित बातम्या