लाचप्रकरणातील हणजूण पंचसदस्य  शीतल दाभोलकर अजून फरारी 

dainik gomantak
मंगळवार, 30 जून 2020

या प्रकरणातील तिसरी संशयित अजून फरारी आहे त्यामुळे तिचा शोध घेण्यास तपास अधिकाऱ्याचा वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती तपास अधिकाऱ्यांनी केली. 

पणजी

हणजूण येथील एका व्यावसायिकाकडून लाचसाठी मागणी करणाऱ्या तीन पंचायत सदस्यांपैकी दोघेजण अटकेत आहे तर तिसरी संशयित शीतल दाभोळकर ही अजूनही फरारी आहे. पोलिसांनी तिच्या निवासस्थानी नजर ठेवली असली तरी ती सापडलेली नाही. तिच्या नातेवाईकांचीही माहिती घेऊन शोध सुरू ठेवला आहे. तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी १ जुलैला ठेवली आहे. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केलेल्या हणजूण - कायसूव पंचायत सदस्य हनुमंत गोवेकर व सुरेंद्र गोवेकर या दोघांना पोलिस कोठडीसाठी न्यायालयात उभे केले असता त्यानी जामिनासाठी अर्ज केले होते. न्यायालयाने त्या दोघाना पाच दिवसांची पोलिस कोठडी देत त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज ठेवण्यात आली होती. या प्रकरणातील तिसरी संशयित अजून फरारी आहे त्यामुळे तिचा शोध घेण्यास तपास अधिकाऱ्याचा वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती तपास अधिकाऱ्यांनी केली. 
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांच्या घराची त्यांच्या उपस्थितीत झडती घेतली आहे. या झडतीवेळी काही संशयास्पद दस्ताऐवज तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. हणजूण - कायसूव पंचायतीमधूनही या प्रकरणाशी संबंधित काही दस्ताऐवज जमा करण्यात येणार आहे. या संशयितांच्या मालमत्तेसंदर्भात विभागाच्या तपास अधिकाऱ्यांनी माहिती जमा केली आहे तसेच त्यांच्या बँकेच्या खात्याचीही चौकशी सुरू केली आहे. या विभागाच्या कारवाईनंतर अनेक पंचायतीमधील सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.  
मिळालेल्या माहितीनुसार पंचायत सदस्य असलेल्या संशयितांनी त्यांच्या प्रभागामध्ये कितीजणांना बांधकाम परवाने मिळवून देण्यास प्रयत्न केले आहे याचीही माहिती मिळवली जात आहे. बेकायदा बांधकामांविरुद्ध तक्रारी दाखल करून त्यांना धमकावणे तसेच खंडणी
वसूल करण्याची पद्धत ते अवलंबित होते. अशाच एका बांधकामप्रकरणी त्यांनी व्यावसायिकाला धमकावून २० लाखाची रोख रक्कम हडपण्याचा डाव त्यांना आखला होता मात्र या व्यावसायिकानेच या पंचसदस्यांना योग्य अद्दल घडवून इतर पंचसदस्यांनाही एकप्रकारे संकेतच दिले आहेत. 

 

संबंधित बातम्या