लाचप्रकरणी हनुमंत गोवेकरला जामीन नामंजूर 

dainik gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार असलेल्या व्यावसायिकांकडून लाच घेताना पंचसदस्य हनुमंत गोवेकर याला अटक केली व त्याचे साथीदार असलेले सुरेंद्र गोवेकर व शीतल दाबोळकर या दोघांनी त्याला अटक होतात तेथून पळ काढला होता.

पणजी

हणजूण येथील एका व्यावसायिकाच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी लाच घेताना अटक केलेले हणजूण - कायसूव पंचायत सदस्य संशयित हनुमंत गोवेकर याला न्यायालयाने जामीन फेटाळला तर संशयित सुरेंद्र गोवेकर याला सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणातील तिसरी संशयित शीतल दाभोळकर हिच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण होऊन त्यावरील निर्णय सोमवारी ठेवण्यात आला आहे. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार असलेल्या व्यावसायिकांकडून लाच घेताना पंचसदस्य हनुमंत गोवेकर याला अटक केली व त्याचे साथीदार असलेले सुरेंद्र गोवेकर व शीतल दाबोळकर या दोघांनी त्याला अटक होतात तेथून पळ काढला होता. त्याच दिवशी रात्री या विभागाच्या पथकाने सुरेंद्र याच्या घरावर पाळत ठेवून त्याला अटक केली होती. त्यानंतर शीतल दाभोळकर हिचा शोध पथकाने सुरू केला होता. मात्र, तिने न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या तिन्ही प्रकरणांमध्ये सरकारी वकील नीता मराठे यांनी बाजू मांडली. 
संशयित शीतल दाभोळकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाला. अर्जदारतर्फे ॲड. कार्लोस फरेरा यांनी बाजू मांडली. या लाच प्रकरणाशी तिचा काहीही संबंध नाही. व्यावसायिकाचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार जीसीझेडएमएकडे नोंद केल्यानंतर त्याने जाणूनबुजून लाच मागत असल्याची तक्रार दाखल केली. अर्जदार हे स्थानिक असून पोलिसांना तपासकामात सहकार्य करण्यास तयार आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, अशी बाजू मांडण्यात आली. या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. कथित बेकायदा बांधकामाविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी या तिघांनी लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तिघांचा या लाचप्रकरणामध्ये समावेश असल्याचे प्रथमदर्शनी जमा करण्यात आलेल्या पुराव्यातून उघड होत आहे. त्याची शहानिशा करण्यास संशयितांची पोलिस कोठडी आवश्‍यक आहे, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. 

 

 

संबंधित बातम्या