‘संजीवनी’ साखर कारखाना साठी केंद्राकडून शंभर कोटी आणा!

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

सुदिन ढवळीकर :कोरोना रुग्णांसाठी योग्य निर्णय घ्या, ‘फ्लेवर्ड मिल्क’चा हिशेब घ्या

फोंडा:  मगो पक्षाच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या हितासाठी संजीवनी साखर कारखाना प्रकल्प उभारला, मात्र आता या संजीवनीचे भवितव्य अधांतरी असून निदान यंदाचा साखर गाळप सिझन तरी व्यवस्थित सुरू करण्यासाठी सरकारने योग्य कार्यवाही करावी, आणि ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करताना संजीवनी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी खात्यांतर्गत शंभर कोटी रुपयांच्या उपक्रमाचा पाठपुरावा करा, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. 

बांदोडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुदिन ढवळीकर यांनी संजीवनी, ऊस उत्पादकांच्या समस्या, राज्यातील कोरोनाची स्थिती तसेच अन्य विविध विषयांवर सरकारी निर्णयावर बोट ठेवताना काही कानपिचक्‍या दिल्या. 

राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना बंद करणे योग्य नाही. ऊस उत्पादकांना मागचे काही पैसे अजून मिळालेले नाहीत, संजीवनी पुन्हा सुरू होईल, की नाही हे कुणाला माहीत नाही. संजीवनी विकू नका, ही संजीवनी शेतकऱ्यांची जीवनदायिनी आहे, सुमारे चार हजार कुटुंबे संजीवनीवर अवलंबून असून केंद्र सरकारच्या कृषी योजनेंतर्गत शंभर कोटी रुपये मिळवा आणि संजीवनी सुरू करा, असे त्यांनी सांगितले.  

राज्यातील आपद्‌ग्रस्तांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मागच्या काळात बंधारा फुटून शेतीत पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, मडकई मतदारसंघात अजून बरेच शेतकरी अशा नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असून याप्रकरणी योग्य कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ त्वरित करून द्या, असे त्यांनी सांगितले. 

राज्यातील सर्व व्यवहार सुरू आहेत, केंद्र सरकार अधिवेशनही घेत आहे, मग गोव्यातच का नाही, असा सवाल करून आपण कोरोनासंबंधीही यापूर्वी योग्य सूचना केल्या होत्या, पण त्या विचारात घेतल्या नाहीत, आणि आता धावपळ सुरू आहे. राज्यातील कोरोना स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था, खाण बंदी तसेच राष्ट्रीय प्रकल्पांसंबंधीच्या घोळावर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन घेणे आवश्‍यक असल्याचेही ढवळीकर म्हणाले. 

दरम्यान, गोवा डेअरीने आमदार, मंत्र्यांच्या वाढदिन तसेच इतर कार्यक्रमांसाठी फ्लेवर्ड मिल्क देण्याचे बंद केल्याचे जाहीर केल्याने या निर्णयाचे ढवळीकर यांनी स्वागत केले आहे. प्रशासकीय समितीने एक योग्य निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

कोरोनासाठी प्राणवायूची ५० मशिन्स हवीत!
कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी प्राणवायूचा पुरवठा करणारी अद्ययावत सुविधांनी युक्त किमान ५० मशिन्स सरकारने गोव्यात आणावी, असा सल्ला सुदिन ढवळीकर यांनी दिला. कोरोना झालेल्या काही रुग्णांना दमा तसेच इतर आजारांमुळे श्‍वासाचा त्रास होतो, तो दूर करण्यासाठी आणि प्राणवायू पुरवणारे एचएसएफएलओ ही किमान पन्नास मशिने आणण्याची आवश्‍यकता आहे. मुख्यमंत्री केवळ तीनच मशीन आणण्याची भाषा करतात, ती तीन मशिन्स कुणाला पुरणार असा सवाल त्यांनी केला आहे. कोरोनासाठी प्रत्येक घरात तपासणी करणाऱ्या साहित्याचा एक वेगळा ‘कीट' देणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे, मात्र हा कीट राज्यातील जनतेला पुरणार काय, असा सवाल करून आधीच सरकारकडे पैसे नाहीत, त्यामुळे असे करण्यापेक्षा जर गावागावातील सध्या बंद असलेल्या मराठी शाळा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी शिकत असलेल्या किंवा निवृत्त झालेल्या परिचारिकांना मानधनावर तैनात करून त्यांच्याकडून गावातील लोकांची जर योग्य तपासणी करून ती वर्गवारी ठेवली आणि कुणाला कोरोनाचा संशय आल्यास त्याची लगेच रवानगी इस्पितळात केल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या