पाहिजे असल्यास जेवणाचा डबा आणा!

dainik Gomantak
मंगळवार, 7 जुलै 2020

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने सरकारकडून प्रभावी उपायांची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या तसेच सरकारी तिजोरीच्या खडखडाटाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मात्र या अधिवेशनात अनावश्‍यक खर्च टाळावा, असे आवाहन करताना केवळ चहा आणि कॉफीशिवाय इतर कोणताही खर्च या अधिवेशनात करू नये, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

फोंडा

पाहिजे असल्यास आमदार, मंत्र्यांना जेवणाचा डबा घेऊन येऊ दे, पण कोणताच भत्ता कुणालाही या अधिवेशनात देऊ नका, असे ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इस्पितळ तसेच इतर उपकरणांसाठी सरकारी खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे इतर अनावश्‍यक खर्चाला सरकारने कात्री लावली पाहिजे. पाण्याची बाटली आणि चहा कॉफी सोडल्यास अन्य कोणताही खर्च करू नका. आमदार, मंत्र्यांसोबतच्या लोकांच्या संख्येवरही निर्बंध घाला, जादा पोलिस ठेवू नका, या सूचनांचा अवलंब अधिवेशनात झाला पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्री व विधानसभा सभापतींनी लक्ष घालावे आणि हा अनावश्‍यक खर्च टाळावा, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
राज्यातील आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे खर्च टाळणे गरजेचे ठरले आहे. केवळ येत्या एक दिवसीय अधिवेशनातच नव्हे तर येत्या डिसेंबरपर्यंत अशाप्रकारचा अवलंब सरकारने करायला हवा, असे त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढले असताना पर्यटन हंगाम खुला करून सरकार काय साधू इच्छिते, असा सवाल सुदिन ढवळीकर यांनी केला. कोरोना संक्रमित झालेल्या पर्यटकांना गोव्यात प्रवेश देऊन आणखी स्थिती बिघडवण्याचा प्रकार होता कामा नये. गोमंतकीय नागरिकांना आधी कोरोनाच्या उच्चाटनासाठी चांगल्या सुविधा द्या. नंतरच इतर विचार करा, अशी सूचनाही सुदिन ढवळीकर यांनी केली.

संबंधित बातम्या