मगोला सत्तेवर आणा..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

मोपा विमानतळावर सर्व प्रकारचे रोजगार पेडणेकरांनाचं मिळवून देण्याची ग्वाही मगो आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर  यांनी मालपे येथे मगोच्या कार्यालयाचे उद्घाटन व प्रवीण आर्लेकर यांच्या मगोत प्रवेश कार्यक्रमात बोलताना दिली .

पेडणे : मगो पक्ष हा या धरतीतून वर आलेला पक्ष आहे.सतरा वर्षे मगोने राज्यात आदर्शवत राज्य केले त्याच धरतीवर परत या भूमीवर सुराज्य येण्यासाठी या मातीतल्या  मगो पक्षाला परत एकदा पेडण्यातून प्रारंभ करुन २१ आमदार द्या आणि गोवा सुजलाम सुफलाम करा असे आवाहन करून मोपा विमानतळावर सर्व प्रकारचे रोजगार पेडणेकरांनाचं मिळवून देण्याची ग्वाही मगो आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर  यांनी मालपे येथे मगोच्या कार्यालयाचे उद्घाटन व प्रवीण आर्लेकर यांच्या मगोत प्रवेश कार्यक्रमात बोलताना दिली .

 मालपे पेडणे येथे कार्यलयाच्या उदघाटनप्रसंगी मगोचे खजिनदार आपा तेली, श्रीधर मांजरेकर, युवा उद्योजक जित आरोलकर ,जिल्हा पंचायत उमेदवार आत्माराम धारगळकर, प्रियांका महाले, डॉ. केतन भाटीकर, पंच राकेश स्वार, सुदीप कोरगावकर, राजेश कवळेकर, चंद्रशेखर खडपकर, तुकाराम हरमलकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले की, मगो पक्षाला मोठा इतिहास व परंपरा आहे. ते वैभव व  इतिहासाची पुनरावृत्ती पेडणे तालुक्यातून करावी, त्यापूर्वी मगोच्या जिल्हा पंचायत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले .

आमदार ढवळीकर पुढे बोलताना म्हणाले कि, २०१७च्या निवडणुकीत चुकीचा उमेदवार दिला तो गद्दार ठरला आता जवळ दिवाळी आली आहे. नरकासुरांचा वध करा. मगो  पक्षासोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांचे अस्तित्व संपले याची अनेक उदाहरणे आहेत. भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री असताना मुंडकार कायदा केला म्हणूनच मुंडकरांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली आणि शशिकला काकोडकरांमुळे कसेल त्याची जमीन हे कायदे आले.

खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे काँग्रेस सरकारने २०११ साली कोळसा आणला. आता हीच मंडळी कोळसा नको आणि दुहेरी रेल्वे मार्ग नको म्हणते आणि रस्त्यावर येतात त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे हे यातून दिसून येते असे ढवळीकर म्हणाले .

सनबर्नविषयी मुख्यमंत्र्यांचे मौनव्रत
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सनबर्न होणार नाही म्हणतात मात्र मुख्यमंत्री  गप्प राहतात.म.गो. पक्षात प्रवेश केलेले प्रवीण आर्लेकर  बोलताना म्हणाले  की, लोकांची सेवा करणे आपणास आवडते. आजपर्यंत पेडणेतून अनेक आमदार मंत्री झाले मात्र विकास झाला नाही. यापुढे सिंहगर्जना करून परत एकदा मगोला  सत्तेवर आणूया असे आवाहन त्यांनी केले सामाजिक कार्यकर्ते जित आरोलकर म्हणाले की, मागील निवडणुकीत चुकीचा उमेदवार व आमदार दिल्याने आम्ही चुकलो. ही चूक पुन्हा होणार नाही.आता त्या भगोड्या व पक्षबदलू विश्वासघातकी  व्यक्तीला  घरी जाण्याची योग्य वेळ पेडणेकर दाखवतील. सर्वसामान्यांत मिसळणारा प्रवीण आर्लेकर योग्य व्यक्ती आणि उमेदवार असल्याचे जाहीर केले .

पंचायत सदस्य राकेश स्वार म्हणाले की, पेडणे भयमुक्त करण्यासाठी सगळ्यानी एकत्र येण्याची आवश्यकता निर्माण झालेली  आहे. यावेळी आपा तेली, श्रीधर मांजरेकर, आत्माराम धारगळकर,चंद्रशेखर खडपकर आदींनी  यावेळी  सद्ध्याच्या राजकीय परिस्थितीत मगो पक्षाला निवडून आणण्याचे आवाहन केले. शर्मिला साळगावकर, सादीशा आर्लेकर व मृणाल पाडगावकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सूत्रसंचालन गौरेश पेडणेकर यांनी केले. सुदीप कोरगावकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या