दोडामार्गच्या तरुणाचा हडफडेत निर्घृण खून

Dainik Gomantak
सोमवार, 22 जून 2020

भांडण मिटल्‍यावर सर्वजण मध्‍यरात्री झोपी गेले. मात्र, मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास संशयित रामभरोसे हा विश्वनाथ गवसच्या खोलीत आला व तो गाढ झोपेत असल्याची संधी साधत धारधार चाकूच्‍या साहाय्‍याने त्याच्यावर वार केले. यावेळी चाकूचे वार छातीवर तसेच मानेवर वर्मी लागल्याने विश्वनाथचा बिछान्यात जागीच मृत्यू झाला.

शिवोली, :

सांकवाडी -हडफडे येथील एका हॉटेलच्या परिसरात रविवारी पहाटे तेथील कर्मचाऱ्यांमध्ये दारुच्या नशेत झालेल्या भांडणाचे पर्यवसान एकाच्‍या खुनात झाले. दोडामार्ग-सिंधुदुर्ग येथील विश्वनाथ सदाशिव गवस (२८ वर्षे, मूळ रा. पिकुळे) या तरुणाचा संशयित रामभरोसे निशाद (मूळ रा. उत्तर प्रदेश) याने चाकूच्‍या साहाय्‍याने भोसकून खून केला. घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी दोन तासांच्या आत संशयितास ताब्यात घेतले. संशयित रामभरोसे निशाद विरोधात भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांकवाडी-हडफडेतील एका हॉटेलमध्‍ये चतुर्थ श्रेणीचे काम करणारा विश्वनाथ गवस हा शनिवारी रात्री हॉटेलमधील एका सहकाऱ्याच्‍या वाढदिनानिमित्त रामभरोसे निशाद आणि अन्य सहकारी मित्रांसोबत पार्टी करीत होता. यावेळी क्षुल्लक कारणावरून गवस आणि रामभरोसे यांच्यात बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर येण्यापूर्वीच सहकारी मित्रांनी मध्‍यस्‍थी करून त्यांना वेगळे करीत झोपण्यासाठी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पाठवले आणि हे प्रकरण थांबले.

गाढ झोपेत चाकूचे सपासप वार...
भांडण मिटल्‍यावर सर्वजण मध्‍यरात्री झोपी गेले. मात्र, मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास संशयित रामभरोसे हा विश्वनाथ गवसच्या खोलीत आला व तो गाढ झोपेत असल्याची संधी साधत धारधार चाकूच्‍या साहाय्‍याने त्याच्यावर वार केले. यावेळी चाकूचे वार छातीवर तसेच मानेवर वर्मी लागल्याने विश्वनाथचा बिछान्यात जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयित रामभरोसे निशाद हा काळोखाचा फायदा उठवित आपल्या खोलीवर आला आणि काही घडलेच नसल्याच्या आविर्भावात खोलीत झोपी गेला.

खोलीतून रक्त बाहेर पडले आणि...
रविवारी सकाळी विश्वनाथच्या खोलीतून रक्त बाहेर वाहत येत असल्याचे दिसताच तेथील सुरक्षारक्षकाच्‍या निदर्शनास येताच त्‍याने आरडाओरड करीत विश्वनाथच्या इतर सहकाऱ्यांना जागे केले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवला. दरम्यान, संशयित आरोपी रामभरोसे निशाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने विश्वनाथच्या खुनाची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

एकुलता एक कमवता मुलगा गेला...
खुनी हल्ल्यात मृत झालेला विश्वनाथ सदाशिव गवस हा अविवाहित तरुण, शालीवाडा-पिकुळे-दोडामार्ग येथील कुटुंबातील एकमेव कमावता तरुण होता. त्याच्या पश्‍चात वृद्ध आई-वडील व एक बहीण आहे. विश्वनाथच्या मृत्यूने गवस कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित बातम्या