गोवा मुक्तीनंतर ५९ वर्षांनी देखील काही गावात समस्या जैसे थे

दैनिक गोमन्तक
शनिवार, 5 डिसेंबर 2020

सत्तरी तालुक्यात आजही गोवा मुक्तीनंतर ५९ वर्षांनी देखील काही गावात समस्या जैसे थे आहेत. सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील बुद्रुक करमळी गावातील माजीकवाडा मुलभूत सुविधांपासून अद्याप वंचितच राहिलेला आहे.

वाळपई: सत्तरी तालुक्यात आजही गोवा मुक्तीनंतर ५९ वर्षांनी देखील काही गावात समस्या जैसे थे आहेत. सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील बुद्रुक करमळी गावातील माजीकवाडा मुलभूत सुविधांपासून अद्याप वंचितच राहिलेला आहे. आजपावेतो लोकप्रतिनिधींनी या समस्येची दखल घेतलेली नाही. यावरून आज शुक्रवारी बुद्रुक करमळी माजीकवाड्यावरील लोकांनी वाळपई वीज कार्यालय, रस्ता विभाग, पाणीपुरवठा विभागात जाऊन अधिकारी वर्गाकडे गावच्या समस्येविषयी कैफीयत मांडली. 

याबाबत नागरिक मधु पर्येकर म्हणाले, गावात रस्त्यावर विजेची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी आमच्या गावात जाणे अगदी भीतीदायक असते. गावच्या लोकांनाही रात्रीचे रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दरवर्षी गावात उत्सव होतात. अशावेळी रस्त्यावर विजेची सोय नसल्याने धोक्याचे ठरले आहे. गावात पाणीपुरवठा जलवाहिनीव्दारे केला जात नाही. नळ पोहचले आहेत, पण पाणी येत नसल्याने नळ कोरडेच आहेत. प्रसंगी गावातील एका ठिकाणी असलेल्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. गावात रस्त्याची सोय नाही. रस्त्या करण्यासाठी रस्ता विभागाकडून कार्यवाही करणे आवश्यक आहे. एकूणच बुद्रुक करमळी गावात साधन सुविधा मिळालेल्या नाहीत ही आमची शोकांतिका आहे. 

यावेळी महिला वर्गानेही गावच्या समस्येचा पाढा वाचून सरकार याकडे गांभीर्याने घेत नाही असे सांगितले. बाहेरून नवीन विवाह होऊन आलेल्या नवीन सुनांना वरील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गोवा मुक्तीनंतर अजूनही हा गाव विकासापासून वंचितच राहिलेला आहे. लोकप्रतिनिधींना केवळ निवडणुकीवेळी गावच्या लोकांची आठवण येते, असेही यावेळी महिलांनी सांगितले.

बुद्रुक करमळीवासीयांनी 
परत केले नळजोडणीचे सामान!

वाळपई येथील पाणीपुरवठा विभागात आज निवेदनाव्दारे कैफीयत मांडण्यासाठी गेलेल्या बुद्रुक करमळीवासीयांनी कार्यालयात नळ जोडणीचे सामान परत सुपुर्द केले. या गावात पाणीपुरवठा विभागातर्फे नळ जोडणी करून दिली आहे, पण या नळातून पाणीच अजून आलेले नाही. त्यामुळे रिकामा कोरडा नळ बसवून काय कामाचा म्हणून नागरिकांनी यावेळी गावातील घरात बसविलेल्या चक्क नळाचे सामान काढून आणून कार्यालयात दिले. यावेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते विश्वेष प्रभू उपस्थित होते. प्रभू यांच्या सहकार्याने लोकांनी वाळपई उपजिल्हाधिकारी, आरोग्य केंद्र वाळपई, वीज खाते, सावर्डे पंचायत, पाणीपुरवठा विभागात जाऊन निवेदने सादर केली आहेत.

आणखी वाचा:

गोवा संघप्रदेश असतानाचे दुसरे नायब राज्यपाल मुल्कराज सचदेव यांची स्मृतिस्थळ विकासाच्या पडद्याआड गायब -

संबंधित बातम्या