फोंड्यात बंद केलेल्या बसगाड्या पुन्हा सुरू..!

dainik gomantak
गुरुवार, 28 मे 2020

बससेवा पूर्ववत सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन नीतीन गोबरे यांनी केले आहे.

फोंडा

गेल्या आठवड्यात बंद केलेली फोंडा भागातील खासगी प्रवासी बससेवा काही अंशी आजपासून (बुधवार) सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि कमी बसगाड्या यामुळे बंद केलेल्या काही खाजगी बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
खासगी प्रवासी बसवाल्यांवर निर्बंध लागू केल्याने नुकसान होत असून, सरकारचा याप्रकरणी या आठवड्याभरात योग्य निर्णय झाल्यानंतर सगळ्या बसगाड्या पूर्ववत रस्त्यावर धावतील, असे बसमालक संघटनेचे नीतीन गोबरे यांनी आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी फोंड्यातील बसमालक, चालक व वाहक उपस्थित होते. नीतीन गोबरे यांनी सांगितले की, देशात असलेल्या टाळेबंदीमुळे खासगी प्रवासी बसगाड्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. राज्यातील ‘कोरोना’संबंधीची टाळेबंदी काहीअंशी शिथिल केल्यानंतर प्रवासी बससेवा सुरू करण्यासाठी वीजमंत्री व बसमालक यांच्यात एका बैठकीत चर्चा होऊन प्रवाशांनी बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावे याबाबत एकमत होऊन काही बसगाड्या सुरू झाल्या. मात्र सामाजिक अंतर पाळून थोड्याच खासगी बससेवा सुरू करण्यात आल्या. तरीपण कमी प्रवासी आणि वाढलेले इंधनाचे दर यामुळे खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने पुन्हा एकदा बसमालकांनी बसगाड्या बंद ठेवल्या.
त्यानंतर खासगी बस मालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. बसमालकांच्या विविध समस्या वाहतूक खात्याचे मंत्री माविन गुदीन्हो यांच्याकडे मांडण्यात आल्या. आता आठ दिवसांनी योग्यप्रकारे तोडगा काढण्यात येईल. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी बसमालकांच्या समस्या त्वरित मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन बसमालकांना दिले आहे. टाळेबंदीच्या काळात प्रवासी कर व बसमध्ये सामाजिक अंतराचे पालन करणाऱ्या बसवाल्यांना सूट दिली जाईल. तसेच विमा कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोलून बस मालकांना इंधन व विमा अनुदान योजनेसंबंधी आठ दिवसांच्या आत सुधारित दर निश्‍चिती करण्यात येणार आहे. बसमालकांच्या समस्या सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री प्रयत्नशील आहे.

संबंधित बातम्या