स्थानिकांच्या पुढाकाराने बाजाराबरोबरच रस्ता, पुलावर व्यवसाय सुरू

प्रतिनिधी
रविवार, 6 सप्टेंबर 2020

स्थानिकांच्या पुढाकाराने बाजाराबरोबरच रस्ता, पुलावर व्यवसाय सुरू

खांडोळा: कोरोनामुळे सगळ्यांचेच अर्थचक्र बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार बंद झाले. काहींच्या पगारालाच कात्री लागली. त्यामुळे बाहेरगावचे लोक आपल्या राज्यात निघून गेले. परंतु मूळ गोमंतकीयांनी रोजचे जीवनचक्र सुरू राहण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारले. काहींनी आपल्या बागायतीत, शेतात जे पिकेल ते गावातच विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे शहराकडे धावणारे गावातील लोक आपल्या गावातच भाजी, फळे विकत आहेत. ग्राहकांनीही ताजी भाजी मिळत आहे.

खांडोळा, माशेल, बाणास्तरीत अवघेच भाजी, फळे विक्रेते होते. त्यातही बाहेरचे विक्रेते अधिक होते. परंतु टाळेबंदीच्या काळात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात या व्यवसायात पाऊल टाकले असून बाजारात अनेकजण नारळ, फळे, काकडी, स्थानिक भाजीची विक्री करीत आहेत. कुंभारजुवे, माशेलातील भाजी पूर्वी पणजीला विकली जात होती. परंतु यंदा ही भाजी गवंडाळी पूल, माशेल बाजार, आमोणा पुलावर विकली जात आहे. कोणीही पणजी, फोंड्याला भाजी विकण्यासाठी जात नाही. तसेच स्थानिक मासे विक्रेतेसुद्धा माशेल मासळी बाजाराव्यतिरिक्त इतर चार-पाच ठिकाणी थोडी थोडी मासळी घेऊन बसलेले असतात. एकूणच आपले अर्थचक्र सुरू राहण्यासाठी आणि कोरोनाकाळात आपले आरोग्य जपण्यासाठी शहराकडे जाण्यापेक्षा गावातच व्यवसाय करणे पसंत करीत आहेत. त्यामुळे गावातील पैसा गावातच राहात असून एक प्रकारे स्थानिक लोक कोरोनानंतरच्या बदलत्या युगात वेगळ्या पद्धतीने जगत आहेत.

स्थानिक पातळीवर बाहेरील फुलांवर अवलंबून राहायचे दिवसही संपले असून काही स्थानिक आपल्या बागेत, शेतात लागवड केलेली विविध प्रकारची फुले गावातच विकत आहेत. मंदिरे बंद असल्यामुळे तेथील महिलांचा रोजगार गेला, परंतु इतरत्र फुले विकली जात आहेत. बाजारात टाळेबंदीनंतर मोठ्या प्रमाणात यंदा अननस विकले गेले असून आताही अननसाची विक्री सुरू आहे. फ्रुट इंडस्ट्रीज काही काळ बंद असल्यामुळे स्थानिकांनी आपल्या बागायतीतील अननस गावातच विकणे पसंत केले. कधीही बाजारात न दिसणारे चेहऱ्यांनी हा व्यवसाय सुरू केला असून अलीकडच्या काळात स्थानिक भाजी मोठ्या प्रमाणात बाजारात विकली जात आहे.

संबंधित बातम्या