कोळसा हाताळणीत वाढ होणार नाही, दिल्लीत आगामी निवडणूकांबाबतही खलबते

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीत आणखी वाढ केली जाणार नाही. त्या हाताळणीपासून होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जहाजोद्योगमंत्री मनसुख मंडाविया हे गोव्यात येणार आहेत. ही आश्वासने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेऊन मिळवली. ​

पणजी : मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीत आणखी वाढ केली जाणार नाही. त्या हाताळणीपासून होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जहाजोद्योगमंत्री मनसुख मंडाविया हे गोव्यात येणार आहेत. ही आश्वासने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेऊन मिळवली. कोळसा वाहतूक या विषयावर राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली. 

कोळसा वाहतुकीस वाढत्या विरोधाची दखल घेत दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मंडाविया यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते. या बैठकीत गोव्याच्या पर्यावरणाला हानीकारक ठरत असल्यास कोळसा हाताळणीच्या प्रमाणात वाढ करू दिली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मंडाविया यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगितले, की या साऱ्याची पाहणी करण्यासाठी मंडाविया यांनी गोव्यात यावे अशी विनंती त्यांना करण्यात आली असून त्यांनी राज्यात येऊन पाहणी करण्याचे मान्य केले आहे

सरकार प्रदूषणाविरोधात आहे. सध्या मुरगाव बंदरातून केली जाणारी कोळसा वाहतूक ही पूर्वीपासून सुरू आहे. कोळसा हाताळणीत वाढ करू दिली जाणार नाही, यावर सरकार ठाम आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोळसा हाताळणीची मर्यादा ठरवून दिली आहे. ती वाढवता येणारी नाही. कोळसा वाहतूक वाढेल म्हणून लोहमार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध होत आहे. कोळसा वाहतूक वाढणार नाही याचा अर्थ लोहमार्गाच्या दुपदरीकरणाला विरोधासाठी मुद्दाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे केंद्रीय जहाजोद्योगमंत्र्यांनी तसे आश्वासन येथे येऊन देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मत्‍स्‍योद्योग आणि पशुसंवर्धनमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. राज्याने दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केल्यानंतर स्वयंपूर्ण गोवा ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या स्वयंपूर्ण गोवा मोहिमेत केंद्र सरकारने योगदान देण्याविषयी या भेटीवेळी चर्चा करण्यात आली. राधामोहन सिंह यांच्याकडे असलेल्या खात्यांच्या योजना राज्यात राबवण्यासाठी यावेळी परस्पर सहकार्य करून त्या योजनांची अंमलबजावणी प्राधान्यक्रमाने करण्याचेही ठरवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘ट्रायफेड’ या केंद्र सरकारच्या यंत्रणेचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांच्याशी आदिवासी कल्याणाच्या योजना आणि राज्यातील अंमलबजावणी याविषयावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत या दौऱ्यात राज्याचे मुख्य सचिव परीमल राय होते.
केंद्रीय पर्यटनमंत्री मुक्तीदिनी पाहुणे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्र्यांनी या भेटीदरम्यान सहकार्य करून सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे नमूद केले. १९ डिसेंबरला होणाऱ्या गोवा मुक्तीदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून पटेल यांनी यावे, असे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले. 

निवडणुकीसंदर्भातही चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपचे संघटनसचिव बी. एल. संतोष यांची भेट घेतली. संघटनात्मक बाबी आणि सरकारची कामगिरी याबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. पालिका, जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सरकारमध्ये कोणते बदल करावे लागतील का, या महत्त्‍वाच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. संघटनात्मक पातळीवर काय केले पाहिजे याचे मार्गदर्शनही संतोष यांनी केले. या साऱ्याविषयी बैठकीत केवळ चर्चा झाली. उद्या मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांची बैठक झाल्यानंतर काही गोष्टी निश्चित केल्या जाणार आहेत. सध्या जनता आंदोलनाच्या भूमिकेत असताना केवळ सरकारची छबी सुधारणे आणि संघटना मजबूत यावरच भर दिला जाणार आहे. 

संबंधित बातम्या