Vishwajit Rane : गोमेकॉच्या अनारोग्यावर ‘कॅग’चे बोट

काँग्रेसची टीका : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांना हटविण्याची मागणी
Vishwajit Pratapsingh Rane
Vishwajit Pratapsingh Ranedainik gomantak

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य विभागात सर्व काही ठीक नाही. महालेखापाल (कॅग)च्या अहवालानुसार राज्याच्या तिजोरीवर १६२ कोटींचा डल्ला घातला आहे. खर्च रुग्णांच्या भल्यासाठी नव्हे तर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या फायद्यासाठीच केला गेला. त्यामुळे मुख्यमंत्री डॉय प्रमोद सावंत हे आरोग्यमंत्री राणे यांना हटवून चौकशीचे आदेश देतील का? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

ते म्हणाले, की गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने २०१८ पासून मेसर्स वेलनेस फॉरएव्हर मेडिकेअरकडून रु. २६२ कोटींची औषधांची खरेदी केली असून, आता महालेखापालांनी या खरेदीत सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे. भाजप सरकारचा हा उघड भ्रष्टाचार आहे. ही औषध खरेदी करताना वित्त विभागाचीही मंजुरी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. घोटाळेबाज मंत्री राणे यांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे.

गोमॅको आणि आरोग्य खात्याने केलेल्या सर्व खरेदीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. विशेषत: कोविड महामारीच्या काळात केलेल्या खरेदींची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये निविदा न काढताच या वेलनेस फोरॲवर कंपनीकडून ४० कोटी रुपयांच्या औषध खरेदीचा घोटाळा उघड केला होता, याची आठवण पाटकर यांनी करून दिली आहे.

काँग्रेसने यापूर्वी आरोग्यमंत्र्यांच्या कोविडवर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून वापरायच्या आयव्हरमेक्टिन गोळ्या खरेदी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. यात सुमारे २२ कोटींच्या खरेदी केलेल्या गोळ्या कुठे वापरल्या गेल्या याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

तर मुख्यमंत्रीही सौद्यात सहभागी :

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आपण आव्हान देतो, त्यांना खरोखरच प्रशासन स्वच्छ व भ्रष्टाचार बंद करायचा असेल तर त्यानी आरोग्यमंत्र्यांवर कृती करून दाखवावी. राणे यांच्यावर कारवाई करण्यात ते अपयशी ठरल्यास मुख्यमंत्री या सौद्यात भागधारक असल्याचे सिद्ध होईल, असा इशारा पाटकर यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com