Calangute: 'गावाची अस्मिता नष्ट करणारा शहरी दर्जा स्थानिकांना मान्य नाही'

Calangute: 'गावाची अस्मिता नष्ट करणारा शहरी दर्जा स्थानिकांना मान्य नाही'
tulio.jpg

पणजी: गोव्यातील (Goa) भाजप सरकार (BJP government) या सुंदर भूमीला केंद्र सरकारच्या भांडवलदार (Capitalist) मित्रांना विकण्यासाठी विविध डाव आखत आहे. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी कळंगुटला (Calangute) शहरी दर्जा देण्याची केलेली घोषणा म्हणजे त्या दृष्टीने  उचललेले पाऊल आहे असा गंभीर आरोप माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी कॉंग्रेसचे (Congress) राज्य प्रवक्ते आर्किटेक्ट तुलीयो डिसोझा (Tuliyo D'Souza) उपस्थित होते.(Calangute Urban status that destroys village identity is not acceptable to locals)

कळंगुटला शहरी दर्जा जाहीर करण्यापुर्वी सरकारने कळंगुटवासीयांना विश्वासात घेतलेले नाही. आमच्या सुंदर गावाची अस्मिता नष्ट करणारा शहरी दर्जा स्थानिकांना मान्य नसल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. सरकारने अधिसुचित केल्याप्रमाणे शहरी दर्जा मिळाल्यानंतर किनारी व्यवस्थापन आराखड्याखाली सध्या अस्तित्वात असलेली 200 मीटर बांधकामाची अट शिथिल होवुन 50 मीटर होणार आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर भल्या मोठ्या इमारती उभ्या राहतील. केंद्र सरकारच्या भांडवलदार मित्रांना  हॉटेल्स व इतर प्रकल्प उभारण्यास मोकळीक देण्यासाठीच भाजपने हे षडयंत्र रचले असून, सदर प्रकल्प आल्यानंतर स्थानिक शॅक व्यावसायिक तसेच जल क्रीडा व्यावसायिकांना जगणे मुश्कील होणार आहे असे फर्नांडिस म्हणाले.

कॉंग्रेस पक्षाने केलेल्या प्रखर विरोधानंतर सरकाने 56 गावांना शहरी दर्जा देण्याची 30 जानेवारी 2020 रोजी जारी केलेली अधिसुचना 18 फेब्रुवारी रोजी रद्द केली होती याची आठवण आर्किटेक्ट तुलीयो डिसोझा यांनी करुन दिली. फेब्रुवारी 2020 ते 27 मे 2021 च्या दरम्यान असे काय घडले जेणेकरुन भाजप सरकारला केवळ कळंगुटला शहरी दर्जा देण्याची गरज भासली असा प्रश्न डिसोझा यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी त्वरित 27 मे 2021 रोजी कळंगुटला शहरी दर्जा (Urban status) देणारी अधिसुचना रद्द करावी. भाजप सरकारने कारवाई न केल्यास कॉंग्रेस पक्ष स्थानीक लोकांना बरोबर घेवुन प्रखर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यांनी दिला आहे. कॉंग्रेस पक्ष लोकांचा आवाज बनून गोमंतकाची अस्मिता सांभाळण्यासाठी नेहमीच तत्पर असेल असेही ते म्हणाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com