पार्से येथे वाघाच्या हल्ल्यात वासरू ठार

Dainik gomantak
मंगळवार, 26 मे 2020

याविषयी बोलताना मोहन साळगावकर म्हणाले वाघाच्या हल्ल्यात आपले गाईचे वासरू ठार झाले आणि एकाला वाघाने जखमी केले. मात्र, अशाच प्रकारे गेल्यावर्षी सुद्धा असाच वाघाने हल्ला केला होता. मात्र, वनखात्याने त्याचा बंदोबस्त लावला नाही परंतु यावर्षी तर या वाघाने भर लोकवस्तीत हल्ला करून वासराला ठार मारले आहे.

मोरजी : पार्से-पेडणे गोवा येथे वाघाने दहशत निर्माण केली असून सोमवारी पहाटे घुमकारवाडा - पार्से येथील मोहन साळगावकर यांच्या गोठ्यातील वासरावर केलेल्या हल्ल्यात एक वासरू ठार झाले तर एकाला गंभीर जखमी केल्याने गावात घबराट पसरली आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की घुमकारवाडा पार्से येथील मोहन साळगावकर यांच्या भर लोकवस्तीत असलेल्या गोठ्यात सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास वासराच्या ओरडण्याच्या आवाजाने साळगावकर कुटुंबीय जागे झाले. गोठ्यातील गुरे का ओरडतात म्हणून पाहण्यासाठी बाहेर आले असता त्यांना एक वाघ दृष्टीस पडला त्यावेळी सर्वांचीच तारांबळ उडाली. मात्र, खबरदारी म्हणून वाघाला घालवून देण्यासाठी मोठमोठ्याने डबे वाजवले तरी वाघ काही तिथून जाईना तेव्हा पाण्याचे रिकामे पिंप वाजवले असता वाघ गोठ्यातून जंगलात निघून गेला. त्याच्या बरोबर दोन लहान बच्छडेही होते, असे सांगण्यात आले 
दरम्यान, सकाळी नेहमीप्रमाणे जंगलातील काजू बागायतीत काहीजण गेले असता त्यांना या वाघाच्या डरकळीचा मोठा आवाज आल्याने भिऊन लोकांनी जंगलातून माघार घेतली आणि आपल्या घरी आले. 
याविषयी बोलताना मोहन साळगावकर म्हणाले वाघाच्या हल्ल्यात आपले गाईचे वासरू ठार झाले आणि एकाला वाघाने जखमी केले. मात्र, अशाच प्रकारे गेल्यावर्षी सुद्धा असाच वाघाने हल्ला केला होता. मात्र, वनखात्याने त्याचा बंदोबस्त लावला नाही परंतु यावर्षी तर या वाघाने भर लोकवस्तीत हल्ला करून वासराला ठार मारले आहे. त्यामुळे आता आमच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, तरी वनखात्याने या वाघाचा बंदोबस्त करून मनुष्यहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले तसेच आपल्याला सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

संबंधित बातम्या