'स्वयंपूर्ण मित्र पंचायतीत’उपक्रम डिचोलीत सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अलीकडेच हा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार चालू नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्येक शनिवारी सरकारी अधिकारी अर्थातच ‘स्वयंपूर्ण मित्र’ प्रत्येक पंचायतीत उपस्थित राहून युवक, महिला गट आदींना मार्गदर्शन आणि सहकार्य करणार आहेत.

डिचोली : ‘आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पनेंतर्गत ‘स्वयंपूर्ण मित्र पंचायतीत’ उपक्रमाला डिचोलीत प्रारंभ झाला आहे. सरकारच्या प्रत्येक योजना तळागाळात पोचवून कृषी, दुग्ध आदी विविध व्यवसायात पुढे आणून युवक, महिला स्वयंसहाय आदी गटांना आत्मनिर्भर बनविण्याच्या हेतूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अलीकडेच हा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार चालू नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्येक शनिवारी सरकारी अधिकारी अर्थातच ‘स्वयंपूर्ण मित्र’ प्रत्येक पंचायतीत उपस्थित राहून युवक, महिला गट आदींना मार्गदर्शन आणि सहकार्य करणार आहेत.

मये पंचायतीत मार्गदर्शन..!
शनिवारी (ता. ७) मये पंचायत सभागृहात सरपंच तुळशीदास चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमास ‘स्वयंपूर्ण मित्र’ उपक्रमाचे तालुक्‍याचे नोडल अधिकारी दीपक बांदेकर, ‘स्वयंपूर्ण मित्र’ अधिकारी पिंकी कुंकळ्येकर, कृषी अधिकारी पंकज पोकळे, पशु संवर्धन खात्याचे पुरुषोत्तम कुंभारजुवेकर आणि पंचायत सचिव महादेव नाईक उपस्थित होते. यावेळी उपसरपंच विश्वास चोडणकर, पंच ऊर्वी मसूरकर, कुंदा मांद्रेकर, सीमा आरोंदेकर आणि कृष्णा परब तसेच महिला, पुरुष शेतकरी उपस्थित होते. सरपंच श्री. चोडणकर यांनी स्वागत करून या उपक्रमाचा स्थानिक जनतेने लाभ उठवून आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले. दीपक बांदेकर यांनी ‘स्वयंपूर्ण मित्र’ उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. ‘स्वयंपूर्ण मित्र’ पिंकी कुंकळ्येकर यांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहन केले. पंकज होबळे यांनी कृषी खात्याच्या विविध योजना आणि मिळणाऱ्या अनुदानाबद्दल विस्तृत माहिती दिली. या योजनांचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्ड करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पुरुषोत्तम कुंभारजुवेकर यांनी पशु संवर्धन खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे अधिकाऱ्यांनी निरसन केले. विश्वास चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले. 
 

संबंधित बातम्या