कांपाल इनडोअर स्टेडियम पुन्हा गजबजले

dainik gomantak
बुधवार, 20 मे 2020

लॉकडाऊन ४.० मध्ये शिथिलता आणताना स्टेडियम आणि क्रीडा संकुले खुली करण्यात परवानगी मिळाली आहे, यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार नियमाचे काटेकोर पालन करत कांपाल येथील इनडोअर स्टेडियमध्ये युवा आणि व्हेटरन खेळाडूंत उत्साह दिसला.

पणजी,

कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंदिस्त अवस्थेत असलेले कांपाल येथील इनडोअर स्टेडियम पुन्हा गजबजले, त्यात शारीरिक संपर्क नसलेल्या खेळांच्या सरावास सुरवात झाली.

लॉकडाऊन ४.० मध्ये शिथिलता आणताना स्टेडियम आणि क्रीडा संकुले खुली करण्यात परवानगी मिळाली आहे, यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार नियमाचे काटेकोर पालन करत कांपाल येथील इनडोअर स्टेडियमध्ये युवा आणि व्हेटरन खेळाडूंत उत्साह दिसला. कांपाल येथील इनडोअर स्टेडियम प्रशिक्षण-सरावासाठी संध्याकाळी ६.३० पर्यंत खुले असेल.

कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये शारीरिक संपर्क नसलेल्या खेळाचा सराव झाला, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या खेळात सबज्युनियर गटापासून व्हेटरन गटातील खेळाडूंनी घाम गाळला. गोव्यात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त कांपाल येथील इनडोअर स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे, मात्र लॉकडाऊन निर्बंधामुळे हे स्टेडियम २४ मार्चपासून क्रीडापटूंसाठी बंदच होते.

व्हेटरन गटातील बॅडमिंटन सरावात क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे सचिव जे. अशोक कुमार यांची कोर्टवरील उपस्थिती लक्षणीय ठरली. अशोक कुमार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारीही आहेत. अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक अशोक मेनन यांनीही अशोक कुमार यांच्या समवेत बॅडमिंटन सरावात भाग घेतला. पणजी परिसरातील राज्यस्तरीय मानांकित बॅडमिंटनपटूंनीही सराव केला.

 

युवा खेळाडू आनंदले...

युवा गटातील राज्यस्तरीय मानांकित बॅडमिंटनपटू सलिल देशपांडे याने पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लॉकडाऊन कालावधीत आपण घरीच तंदुरुस्तीविषयक व्यायामावर भर दिला, तसेच छंद जोपासल्याचे त्याने सांगितले. गतमोसमात राष्ट्रीय सबज्युनियर (१३ वर्षांखालील) बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केलेल्या श्रीया सराफ हिनेही मंगळवारी बॅडमिंटन सराव सत्रात भाग घेतला. ``गतमोसमात राज्यस्तरीय स्पर्धांत मी चांगले खेळले, लॉकडाऊनमुळे प्रशिक्षणात खंड पडला. आज पुन्हा पुन्हा बॅडमिंटन खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी उत्साहित आहे. दीर्घ काळानंतर खेळल्यामुळे थोडे अवघडले, पण पुन्हा एकदा नियमित सराव करण्याचे नियोजन आहे,`` असे श्रीया हिने सांगितले.

 

बॅडमिंटन संघटनेकडून स्वागत

स्टेडियम पुन्हा खोलण्याच्या निर्णयाचे गोवा बॅडमिंटन संघटनेने स्वागत केले आहे. संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले, की ``स्टेडियम पुन्हा खुली करण्याच्या निर्णयाने आम्ही आनंदित आहोत. कोविड १९ मुळे यंदा गोवा बॅडमिंटन संघटनेला उन्हाळी सुट्टीतील प्रगत बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर घेता आले नाही. आता क्रीडा मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यामुळे आम्ही कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये निवडक राज्यस्तरीय खेळाडूंसाठी प्रशिक्षण-सराव शिबिर घेऊ. खेळाडूंना पुन्हा खेळातील लय प्राप्त व्हावी या त्यामागचा मुख्य उद्देश आहे. ६.३० पर्यंत वेळेचे बंधन पाळावे लागेल, पण सुरवात झालीय हे महत्त्वाचे आहे.``

संबंधित बातम्या