'काणकोण पालिकेच्या प्रभागांची फेररचना होणार'

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

राज्यातील ‘ब’ वर्गातील पालिकांच्या प्रभाग संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव नगर विकास खात्याने तयार केला असून, त्यासंदर्भात संबंधित मामलेदारांना १२ जानेवारीपर्यंत प्रभागाची पुनर्ररचना करून माहिती पाठविण्याची सूचना केली आहे.

काणकोण :  राज्यातील ‘ब’ वर्गातील पालिकांच्या प्रभाग संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव नगर विकास खात्याने तयार केला असून, त्यासंदर्भात संबंधित मामलेदारांना १२ जानेवारीपर्यंत प्रभागाची पुनर्ररचना करून माहिती पाठविण्याची सूचना केली आहे. त्यामध्ये डिचोली, कुंकळ्ळी, कुडचडे, केपे व काणकोण पालिकांचा समावेश आहे.

काणकोण पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये वाढ करून बारा करण्यात येणार आहे, असा प्रस्ताव असल्यामुळे काही इच्छुक उमेदवारांत धास्ती निर्माण झाली आहे. त्यामध्ये पाळोळे व मास्तीमळ प्रभाग फोडून नवीन दोन प्रभाग करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली होती. त्यानुसार, हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते आणि हे वृत्त आता खरे ठरले आहे. 
सध्या काणकोण पालिकेत दहा प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात सत्तधारी भाजपचे समर्थक इच्छुक उमेदवारांची संख्या दोनपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची उमेदवारांची निवड करण्यासाठी व समर्थन देण्यासाठी मोठी गोची होणार होती. मात्र, आता पालिका निवडणुका पक्ष पातळीवर होणार नसल्याने काणकोणात भाजप नेत्यासमोरील फाटाफुटीचे संकट ताप्तुरते टळले आहे.

काणकोणात भाजपचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर व माजी आमदार विजय पै खोत असे तीन नेते आहेत. उपसभापती फर्नांडिस यांनी माजी आमदार विजय पै खोत यांना विश्वासात घेऊन पालिका निवडणुकीत उमेदवार निवडण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, या संदर्भात माजी मंत्री तवडकर यांनी या संदर्भात अद्याप मौन पाळले आहे. फेब्रुवारी महिन्यांत पालिका निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी  तीन आठवड्यापूर्वी तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.

या संदर्भात काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांना विचारले असता, नगर विकास खात्याने प्रस्ताव पाठवून १२ जानेवारीपर्यंत प्रभाग पुनर्रचनेची माहिती कळविण्याची सुचना ६ जानेवारीला खात्याने पत्रातून करण्यात आली आहे. भौगोलीकदृष्ट्या कोणत्या प्रभागाची पूनर्रचना करणे शक्य आहे, याची शहानिशा करण्यात येणार आहे. पालिका क्षेत्रात दहा हजारांपेक्षा कमी मतदार आहेत, त्याची विभागणी करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. परंतु हा प्रस्ताव असल्याचे मामलेदार दलाल यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या