‘गोयात कोळसो नाका’ आंदोलकांवर दाखल केलेला गुन्हा रद्द करा

दैनिक गोमन्तक
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

जनविरोधी प्रकल्पाला सरकार प्रोत्साहन देत असल्यामुळे गोमंतकीय नागरिक आज पेटून उठला असून गोव्यातील भाजप सरकार हे अदानी सरकार बनलेले आहे.

सासष्टी : गोव्यात कोळसा नको संघटनेने हल्लीच रेलमार्ग दुपदरीकरणाच्या विरोधात चांदर परिसरात पुकारलेल्या आंदोलनात पोलिसांनी सहा आंदोलकांवर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आंदोलकांनी एकत्र येऊन आज मडगाव येथील दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयावर मोर्चा नेला. पोलिस उपअधीक्षक किरण पडुवळ यांनी आंदोलकांना धमकी दिल्याप्रकरणी तसेच गोव्यातून कोळसा वाहतूक करण्यासाठी प्रयत्न करणारे जिंदाल, अदानी, वेदांता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे निवेदन ‘गोयात कोळसो नाका’ संघटनेने पोलिसांना सादर केले. 

चांदर परिसरात रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने ‘गोव्यात कोळसा नाका’ संघटनेने आंदोलन पुकारले होते. या रेलमार्ग दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांनी रस्ता अडविल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा आंदोलकांवर गुन्हा नोंद केला असून यात ‘गोव्यात कोळसा नाका’ संघटनेचे सहनिमंत्रक अभिजित प्रभुदेसाई, संदेश तळेकर व अन्य चार जणांचा समावेश आहे. पोलिसांनी आज अभिजित प्रभुदेसाई व संदेश तळेकर यांची चौकशी करण्यासाठी दोघांना बोलाविले होते. पोलिसांनी या सहाही जणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी घेऊन आज मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयावरच मोर्चा नेला. 

कोळसा वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रेलमार्ग दुपदरीकरण करण्यात येत असल्यामुळे आज हजारो संख्येने गोमंतकीय नागरिक रस्त्यावर उतरून या दुपदरीकरणास विरोध करीत असून दुपदरीकरणाविरोधात गोव्यातील अर्ध्याहून जास्त पंचायतींनी ठराव घेतला आहे. तरी, जनतेचा विरोध डावलून रेलमार्ग प्रकल्प पुढे रेटून गोमंतकीयांना त्रास करू पाहणारे जिंदाल, अदानी, वेदांता यांच्यासह मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी नोंदवण्याचे आवाहन सहनिमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी केले. होस्पेट, बळ्ळारी येथील उच्च श्रेणीचे खनिज परदेशात विकून पैसा कमवू पाहणारे देशविरोधी असून त्यांच्या विरोधात देशद्रोही म्हणून तक्रार दाखल केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

चांदर परिसरात रस्ता बंद करण्यात येणार असल्याचा आदेश आधीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता, तर बंद असलेला हा रस्ता अडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे कायद्याच्या विरोधात आहे. या आंदोलनात १० हजार गोमंतकीय नागरिक व काही आमदारही उपस्थित राहिले होते, पण पोलिसांनी फक्त सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून याप्रकरणात पोलिसांनी सर्वांवरच गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे. सर्व ठिकाणी करण्यात येणारी आंदोलने शांततापूर्वक करण्यात येत असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करणे योग्य नाही, असे संदेश तळेकर यांनी सांगितले. लोकशाही मार्गाने मुख्यमंत्री तसेच चाळीसही आमदारांना निवेदन सादर करण्यात आले असून  यापुढे जे होणार त्याला फक्त सरकारच जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जनविरोधी प्रकल्पाला सरकार प्रोत्साहन देत असल्यामुळे गोमंतकीय नागरिक आज पेटून उठला असून गोव्यातील भाजप सरकार हे अदानी सरकार बनलेले आहे. गोवा सरकारच्या चुकीमुळे संपूर्ण गोमंतकीय आज एकजूट झाले असून येणाऱ्या काही दिवसात सरकारला आपली चूक कळून येईल, असे ‘गोंयचो आवाज’ संघटनेचे व्हिरीयेतो फर्नांडिस यांनी सांगितले. दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयावर मोर्चा नेऊन आज आंदोलकांनी सहाजणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे रद्द करावे, सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस निरीक्षकाविरुद्ध कारवाई करावी, आंदोलकांना धमकी देणारे पोलिस उपअधीक्षक किरण पडुवळ यांच्यावर कारवाई करावी तसेच जिंदाल, अदानी, वेदांता, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, आरव्हीएनएल व्यवस्थापक साहू आणि एमपीटीच्या चेअरमेनाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे निवेदन संघटनेने पोलिसांना दिले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या