म्हापसा नगरपालिका बाजारातील पे-पार्किंग त्वरित रद्द करा

वार्ताहर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

म्हापसा नगरपालिका बाजारपेठेतील म्हापसा व्यापारी संघटनेने केलेल्या अनेक सूचनांपैकी काही सूचना पालिकेने अंमलात आणल्यामुळे आज (मंगळवारी) काही व्यापाऱ्यांनी संघटनेच्या विरोधात बंड पुकारून दुकानधारकांना त्यांच्या दुकानातील माल पदपथावर ठेवण्यास अनुमती देण्याची तसेच पालिकेने बाजारात पे-पार्किंग सुरू केले आहे, ते त्वरित रद्द करावे, अशी जोरदार मागणी केली.

म्हापसा: म्हापसा नगरपालिका बाजारपेठेतील म्हापसा व्यापारी संघटनेने केलेल्या अनेक सूचनांपैकी काही सूचना पालिकेने अंमलात आणल्यामुळे आज (मंगळवारी) काही व्यापाऱ्यांनी संघटनेच्या विरोधात बंड पुकारून दुकानधारकांना त्यांच्या दुकानातील माल पदपथावर ठेवण्यास अनुमती देण्याची तसेच पालिकेने बाजारात पे-पार्किंग सुरू केले आहे, ते त्वरित रद्द करावे, अशी जोरदार मागणी केली.

अखिल गोवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर, म्हापसा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष यशवंत गवंडळकर यांच्या नेतृत्वाखाली वैभव राऊळ, गितेश डांगी, भारत तोरस्कर, सुशांत पेडणेकर, संतोष बेळेकर, राजेंद्र पेडणेकर, श्रीपाद येंडे, निलेश पर्रीकर, मोये ब्रांगाझा आदी व्यापारी वर्गाने नगराध्यक्ष रायन ब्रांगाझा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी म्हापसाचे आमदार जोसुवा डिसौजा, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, पालिका बाजार समिती अध्यक्ष सुशांत हरमलकर, उपनगराध्यक्ष मार्लीन डिसौजा, फ्रेकी कारव्होलो, तुषार टोपले, स्वप्‍नील शिरोडकर हे नगरसेवक उपस्थित होते.

अखिल गोवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर यांनी युक्तीवाद करताना सांगितले, पालिका बाजारपेठेतील दुकानासमोरील पालिका पदपाथ म्हणतात. पण, प्रत्यक्षात प्रत्येक दुकानधारकाचे ती जागा व्हरांडा आहे. आमच्या स्वतःच्या व्हरांड्यातील साहित्य उचलण्याचा अधिकार पालिकेला अधिकार नाही. 
पालिकेचे निरीक्षक व्यापाऱ्यांकडे दादागिरी करतात. तसेच रस्त्यावर बसणाऱ्या फेरीविक्रेत्यांना पुन्हा बाजारात बसण्यास परवानगी देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. पालिकेने बाजाराचा आर्थिक कणा मोडला आहे. बाजारपेठेला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी पालिकेने सहकार्य करण्याची गरज आहे. आम्हाला सुखात व्यवसाय करायला पालिकेने देण्याची गरज आहे. प्रत्येक व्यापारी त्रस्त आहे. त्याला सावरण्याची गरज आहे. म्हापसा व्यापारीसंघटनेला आम्ही पाहून घेऊ असे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे मृत्यू येण्यापूर्वी भुकेने मृत्यू येईल असे सांगितले.

म्हापसा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष यशवंत गवंडळकर यांनी पुन्हा शुक्रवारचा बाजार चालू करण्याची मागणी केली तसेच बाजारात घातल्या गेलेल्या गॅट काढून टाकली पाहिजे. पे पार्किंग त्वरीत बंद केले पाहिजे. म्हापसा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना ६० सेंटिमीटर जागा साहित्य ठेवण्यास देण्याची मागणी केली. कोरोना महामारीमुळे  पालिकेने म्हापसा बाजाराची वाट लावून ठेवली आहे. या सर्व घटनाना पालिका जबाबदार आहे. विद्यमान संघटनेच्या अध्यक्षांना त्यांच्या वडिलांनी कमवून ठेवले आहे.

वैभव राऊळ, निलेश पर्रीकर, गीतेश डांगी, भारत तोरस्कर यांनी बाजारात दुचाकी वाहनाना प्रवेश देण्याची मागणी केली. दुचाकी वाहनाना प्रवेश नसल्यामुळे किराणा दुकानधारकांना ग्राहक नाही आमचा व्यवसाय २० टक्के झाला आहे. पे पार्किंग त्वरीत बंद करावी अशी मागणी केली गेली. पालिकेच्या आर्शिवादाने बाजारपेठ बाहेर नवीन व्यापारी तयार झाले आहेत. त्याचा व्यवसाय जोरात चालतो पण आम्ही बाजारात व्यापारी ग्राहकाची वाट पाहत बसतो. दुपारपर्यंत आम्ही गिऱ्हाईक करत नाही अशामुळे व्यापाऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे.

संबंधित बातम्या