गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारांची धावपळ

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 डिसेंबर 2020

सत्ताधारी भाजप सरकारला जिल्हा पंचायत निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या यशावरच पुढील पालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणूक अवलंबून असणार आहे.

पणजी :  सत्ताधारी भाजप सरकारला जिल्हा पंचायत निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या यशावरच पुढील पालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणूक अवलंबून असणार आहे. राज्यात सरकारच्या विविध प्रकल्पांना जोरदारपणे लोकांचा विरोध होत आहे. त्यामुळे मतदारांची मते वळवण्यासाठी भाजपची कसोटी लागणार आहे. जिल्हा पंचायतीसाठी ५० पैकी ४८ जागांसाठीही निवडणूक होत आहे, त्यामध्ये भाजप ४१ तर काँग्रेस ३७ जागा लढवीत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे. जिल्हा पंचायतीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी पक्षाचे किमान २६ उमेदवार निवडून यायला हवेत. मगो १७, आप २० जागा लढवीत आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या पाहून पाठिंबा घ्यावा लागेल किंवा द्यावा लागणार आहे.  या निवडणुकीत ७८ अपक्ष उमेदवार असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यात काहीजण पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोर उमेदवारही आहेत. 

 

विधानसभा मतदारसंघातील आमदाराचे जिल्हा पंचायतींवर वर्चस्व असले, तरी काही काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने व भाजपने त्यांना स्वीकारल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बंडखोरांकडून मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविडच्या काळातील अनेक दुर्बंल घटकांना बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावत असून सरकारने त्यांना काही आर्थिक साहाय्य देण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. खाणीचा प्रश्‍न अजूनही धसास लागत नाही. मात्र आश्‍वासने दिले जात आहेत. लोकांचा विरोध असूनही काही प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकल्प गोव्यासाठी कसे फायदेशीर आहेत, याची समजूत सरकारकडून घातली जात आहे, मात्र लोक ते ऐकण्यास तयार नाहीत. या सर्व पाश्‍वभूमीवर विरोधी पक्ष लोकांना पाठिंबा देत आहेत. त्यांच्या आंदोलनातही सहभागी होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला वर्चस्व मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यापासून पर्याय राहिलेला नाही. 
उमेदवारांनी प्रचारासाठी घरोघरी मतदारांची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रचार गेल्या मार्चमध्येच संपलेला असून मतदान व मतमोजणी होणे बाकी आहे. त्यामुळे उघडपणे प्रचार करण्यासाठी बंदी आहे. काहीनी भेटीगाठी घेण्याच्या नावाखाली प्रचार करत आहे.

 

काही मतदारसंघातील मतदार चौकस झाले आहेत. उमेदवार निवडून आल्यावर कोणते विषय हाती घेणार आहेत, असा प्रश्‍नांचा भडिमार केल्यावर उमेदवारांना तेथून काढता पाय घ्यावा लागत आहे. निवडणूक घोषित झाल्याने निवडणूक अधिकारी यंत्रणाही सक्रिय झाली आहे. पोलिस वाहन गस्त जिल्हा पंचायत मतदारसंघामध्ये वाढवण्यात आली आहे. संवेदनशील प्रभाग केंद्रे असलेल्या ताळगाव, चिंबल तसेच कुर्टी व दवर्ली येथे पोलिस नियंत्रण कक्षाची वाहने फिरू लागली आहेत. 

 

‘कोविड’मुळे मतदारांमध्ये निरुत्साह  

राज्यात कोरोना संसर्गामुळे मतदारांमध्ये उत्साह नाही. निवडणुकीचा उत्साह बारगळलेला दिसत आहे. त्यामुळे मतदानाचेप्रमाण मागील निवडणुकीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. काही राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही मतदारांची गाठीभेटी घेत आहेत. मतदान केंद्रावर जरी कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांची पूर्तता करण्यात येणार असली तरी कोरोना संसर्गाच्या भीतीने मतदारही निवडणुकीबाबत गंभीर असल्याचे दिसत नाहीत.  

 

मतदान केंद्राची पाहणी सुरू 

मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी निर्वाचन अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तेथे आवश्‍यक असलेल्या साधनसुविधांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बुथस्तरीय कर्मचाऱ्यांना त्या पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या आहेत. या केंद्राच्या ठिकाणी मतदारांना सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी जमिनीवर ‘मार्किंग’ करण्याचे काम येत्या काही दिवसांत हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. 

 

पोलिस सुरक्षेसाठी आढावा बैठक 

जिल्हा पंचायत निवडणूक व गोवा मुक्तिदिन षष्ट्यब्दीपूर्वी सोहळ्यासाठी राष्ट्रपतींच्या उपस्थितीसंदर्भात उच्चस्तरीय पोलिस सुरक्षा आढावा बैठक पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस मुख्यालयात झाली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा झाली. सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना पोलिस ठाणे प्रमुखांना तसेच वरिष्ठांना मीणा यांनी दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व अधीक्षक महेश गांवकर यांनी दिली.  मतदारसंघामधील पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात तसेच असलेली कमतरता याचा आराखडा तयार करावा व वरिष्ठांना सादर करावा, असे संकेत देण्यात आले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गोवा मुक्तिदिनाच्या षष्ठ्यब्दीपूर्वी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्या ठिकाणी हा सोहळा कार्यक्रम होणार आहे, तसेच ते जेथे जाणार असतील तेथील सुरक्षा व्यवस्था याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

 

अधिक वाचा :

उमेदवाराचे निधन झाल्याने  नावेली मतदारसंघातील निवडणूक रद्द 

गोव्यातील बाजारपेठा ‘नाताळ’साठी सजल्या

गोव्यात कोरोना बळींची संख्या ६९७ वर

संबंधित बातम्या