परिस्थितीनुसार ‘कनटन्मेंट झोन’चा निर्णय

dainik gomantak
गुरुवार, 9 जुलै 2020

या बैठकीला कुंभारजुवेचे आमदार वगळता ताळगावच्या मंत्री जेनिफर मोन्सेरात, सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस व सांत आंद्रेचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा उपस्थित होते.

पणजी

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने तो रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागती तसेच आमदार व सरकारी यंत्रणातील समन्वयासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिसवाडी तालुक्यातील मतदारसंघाच्या आमदारांची बैठक घेतली. कोरोना बाधित रुग्णांच्या परिस्थितनीनुसार ‘कनटन्मेंट झोन’चा निर्णय संबंधित मतदारसंघातील आमदार व यंत्रणेने घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. 
या बैठकीला कुंभारजुवेचे आमदार वगळता ताळगावच्या मंत्री जेनिफर मोन्सेरात, सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस व सांत आंद्रेचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा उपस्थित होते. या बैठकीनंतर माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, तिसवाडी तालुक्यातील पाचही मतदारसंघातील कोविड - १९ ची पूर्ण स्थिती व आढावा घेण्यात आला व त्याविरुद्ध लढा देण्यासाठी व देखरेखीसाठी व्यूहरचना ठरविण्यात आली. या कामामध्ये सरकारी यंत्रणेने स्थानिक आमदाराला सामावून घेण्याचे ठरले. दरदिवशी जो कोरोना बाधित रुग्णांचा अहवाल येतो तो आमदारांना पाठवून त्या त्या मतदारसंघातील कोरोना बाधित रुग्णांची माहिती देण्यासाठी एक ‘ॲप’ तयार करून त्यामध्ये तालुक्यातील उपजिल्हाधिरी, मामलेदार, आरोग्य अधिकारी व पोलिस निरीक्षकांना समावेश केले जाणार आहे. त्यामुळे या कोविड - १९ ची जबाबदारी सरकारी यंत्रणेबरोबरच आमदार तसेच पंचायत लोकप्रतिनिधींवर सोपविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. 
मतदारसंघातील पोझिटिव्ह कोरोना बाधित रुग्णांची माहिती संबंधित आमदाराला देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे या बाधित रुग्णाच्या अवतीभोवती असलेल्या वस्तीवर देखरेख ठेवण्याचे काम सोपे होईल. मतदारसंघात एखाद्याची वाढदिवस पार्टी किंवा इतर कार्यक्रम असल्यास त्याची माहिती पोलिसांना देऊन पुढील कारवाईबाबत योग्य ती पावले उचलणे सोपे होणार आहे. जर मतदारसंघात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच गेली तर त्या मतदारसंघात कोविड निगराणी केंद्र उभारण्यासाठी योग्य अशी जागा पाहण्यात आली आहे व परिस्थितीनुसार ते सुरू केले जाईल. ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत त्याच्या अवतीभवती असलेल्या वस्तीतील अधिकाधिक लोकांच्या चाचण्या केल्या जातील असे मत मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी व्यक्त केले. 
शिरेण - चिंबल येथे मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडले होते मात्र त्यातील बहुतेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत
तरी काही नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ही साखळी मोडून काढण्यासाठी सरकारी यंत्रणा व आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी एकत्रित काम करणार आहेत, असे आमदार टोनी फर्नांडिस म्हणाले.  
 

 

संबंधित बातम्या