सावधान! राजधानीत दररोज 80 ते 100 जणांना कोरोनाचा संसर्ग  

सावधान! राजधानीत दररोज 80 ते 100 जणांना कोरोनाचा संसर्ग  
corona.jpg

पणजी : पणजी महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  झपाट्याने वाढत आहे. दर दिवशी 80  ते 100 व्यक्तींना कोरोनाची बाधा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे, त्याचबरोबर डॉन बास्को येथील सभागृहांमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणत भाग घेऊन  ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन महापौर रोहीत मोन्सेरात यांनी केले आहे. (In the capital Panaji 80 to 100 people are infected with corona every day) 

आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोन्सेरात यांनी सांगितले, की महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाची बाधा होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न चालू आहेत. महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झालेली आहे.  त्यामुळे महापालिकेच्या कामावरही परिणाम झालेला  आहे. मात्र, महापालिकेतर्फे एका बाजूला कोरोना महामारी विरोधी काम आणि दुसऱ्या बाजूला  मॉन्सूनपूर्व कामेही महापालिकेने जोरात सुरू केले आहे.

स्मशानभूमी रात्री 9  पर्यंत खुली

पणजी - सांतइनेज येथील महापालिकेच्या मालकीची स्मशानभूमी रात्री नऊवाजेपर्यंत चालू  ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. यापूर्वी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत स्मशानभूमी चालू असायची. मात्र, सध्या कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पणजी येथील स्मशानभूमी खुली ठेवावी लागत असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सांतइनेज येथील स्मशानभूमीमध्ये कोरोनामुळे जे व्यक्ती मृत्युमुखी पडतात, त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन स्थाने निश्चित करण्यात आलेली असून इतर  मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी उर्वरित चार स्थाने राखीव ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांना या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करायचे असतील त्यांनी महापालिकेशी संपर्क साधून परवानगी घ्यावी लागते. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी काही ठिकाणी विरोध होत असल्याने त्यासाठी पणजी स्मशानभूमी एक पर्याय ठरला आहे.

‘प्रिवोरीटी’तर्फे दोन यंत्रे

सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत येथील प्रिवोरीटी ग्रुपतर्फे पणजी महापालिकेला चार वेड कटींग यंत्रे आज देण्यात आली. प्रिवोरीटीचे संचालक परिंद नास्नोलकर व स्वप्नील नास्नोलकर यांनी ही यंत्रे आज  महापौर रोहित मोन्सेरात यांच्याकडे सुपूर्द केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com