सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची प्रकरणे म्हापसा भागात जास्त

dainik gomantak
शनिवार, 9 मे 2020

गोवा जिल्ह्यामध्ये ११ पोलिस स्थानकांचा समावेश होतो ज्यामध्ये पणजी, जुने गोवे, आगशी, म्हापसा, हणजूण, पेडणे, पर्वरी, कळंगुट, साळगाव, डिचोली आनी वाळपई पोलीस स्थानकांचा समावेश आहे.

पणजी, 

म्हापसा पोलिस स्थानकाच्या भागामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची प्रकरणे सर्वात जास्त प्रमाणात घडलेली असून, म्हापसा भागामध्येच या प्रकरणी सर्वाधिक जणांवर गुन्हे दखल झाले आहेत. थुंकण्याच्या प्रकरणांमध्ये सर्वात जास्त जणांना अटक कळंगुट पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाल्याचे पाहायला मिळते.
‘कोविड-१९’ साठीच्या टाळेबंदीच्या काळामध्ये नोंद झालेल्या आकडेवारीनुसार उत्तर गोव्यात मार्च २५ ते ३ मे २०२० या काळामध्ये एकूण १,३१३ जणांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून, १८० लोकांविरुद्ध मास्क न वापरल्याबद्दल जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण ४६१ जणांना अटक करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याशी संबंधित वाहन कायदा उल्लंघन प्रकरणी १९ हजार ६१ प्रकरणे नोंद झालेली आहेत. यामध्ये ३१८ प्रकरणांमध्ये एफआयआर नोंद झालेल्या आहेत तर २०२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
थुंकण्याच्या प्रकरणांमध्ये १ लाख ३१ हजार रुपये दंडाच्या स्वरूपात गोळा करण्यात आले असून मोटार वाहन कायद्यांच्या उल्लंघनप्रकरणी नोंद झालेल्या एकूण प्रकरणांमध्ये २० लाख ८९ हजार रुपये गोळा करण्यात आलेले आहेत. उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये ११ पोलिस स्थानकांचा समावेश होतो ज्यामध्ये पणजी, जुने गोवे, आगशी, म्हापसा, हणजूण, पेडणे, पर्वरी, कळंगुट, साळगाव, डिचोली आनी वाळपई पोलीस स्थानकांचा समावेश आहे.
मोटार वाहन कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी नोंद झालेल्या प्रकरणांमध्ये सर्वात जास्त प्रकरणे पणजी पोलीस स्थानकात नोंद झाल्याचे पाहायला मिळते. पणजी पोलिस ठाण्यात २,९४५ प्रकरणे नोंद झाली असून पणजी पोलिस स्थानक वाहनांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर म्हापसा पोलीस स्थानक पणजीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असून २,८२८ प्रकरणे म्हापसा स्थानकाच्या हद्दीत नोंद झालेली आहेत. कळंगुटमध्ये या प्रकरणांमध्ये १०५ एफआयआर नोंद झालेल्या असून पणजी पोलिस ठाण्यामध्ये ६५ एफआयआर नोंद झालेले आहेत. लॉकडाउनच्या काळात वाहने जप्त करण्याच्या प्रकरणांमध्ये कळंगुट पोलिस स्थानक आघाडीवर असून, एकूण ८१ वाहने या स्थानकाच्या हद्दीत जप्त करण्यात आली तर म्हापसा व पर्वरी पोलिस ठाण्यांमध्ये २३ वाहने जप्त करण्याच्या कारवाया झाल्या. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या प्रकरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे ४३ प्रकरणे हणजूण पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. या पोलिस स्थानकामध्ये सर्वात कमी म्हणजेच केवळ दोन जणांना अटक झाली असून केवळ २ एफआयआर नोंद करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे केवळ २ वाहने हणजुणे पोलिस स्थानकात जप्त करण्यात आली.

संबंधित बातम्या