काजू उत्पादकांना हमीदराचा लाभ जूनमध्ये मिळणार ः आफोन्सो

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

यंदाच्या हंगामात सुरवातीला १२५ रुपये प्रति किलो दराने काजू विक्री करण्यात येत होती, परंतु टाळेबंदीत काजूची खरेदी व विक्री बंद झाली.

सासष्टी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत काजू उत्पादकांना झळ बसू नये यासाठी सरकारने प्रतिकिलो काजूचा १२५ रुपये हमीदर केला असून ज्या शेतकऱ्यांनी १०५ रुपये दरात काजू विक्री केली आहे, त्या शेतकऱ्यांना जून महिन्यापासून प्रति किलो २० रुपये उर्वरित रक्कम देण्याच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी संचालक नेव्हील आफोन्सो यांनी दिली.
यंदाच्या हंगामात सुरवातीला १२५ रुपये प्रति किलो दराने काजू विक्री करण्यात येत होती, परंतु टाळेबंदीत काजूची खरेदी व विक्री बंद झाली. टाळेबंदीमुळे शेतकरी संकटात पडू नये, यासाठी सरकारने शेतीविषयक सर्व कामकाजास परवानगी दिली आणि यामुळे काजूची खरेदी व विक्री प्रक्रियेलाही सुरवात करण्यात आली, परंतु टाळंबेदीत काजू १०५ रुपये प्रति किलो दराने विक्री केला जात असल्यामुळे काजूच्या दरात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांद्वारे करण्यात येत होती. त्यानुसार सरकारने १०० रुपये असलेला हमीदर १२५ रुपये केला, असे आफोन्सो यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी हमीदर मिळण्यासाठी संबंधित कृषी विभागीय कार्यालयात काजू विक्री केलेली बिले आणून देण्यास सुरवात केली असून जून महिन्यापासून शेतकऱ्यांना हमीदर देण्याच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार आहे. हा हमीदर कृषी कार्ड धारकांनाच मिळणार आहे, अशी माहिती कृषी संचालक नेव्हील आफोन्सो यांनी दिली. कृषीविषयक कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्ड महत्वाचे असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कार्डसाठी अर्ज केला नाही, त्या शेतकऱ्यांनी सर्वप्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्ड बनवून घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकारने काजूचा हमीदर १०० रुपयांवरून १२५ केल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी आहे. मात्र, कृषी खात्याकडून हा हमीदर मिळवून घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडे कृषीकार्ड असणे महत्त्वाचे आहे. काजू, भात, नारळ व अन्य पिकांचा हमीदर मिळवून घेण्यासाठी कृषीकार्ड महत्त्वाचे असून सर्वांसाठी हा सामान्य नियम आहे, असे नेव्हील आफोन्सो यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांनी आतापासूनच हमीदर मिळविण्यासाठी बिले देण्यास सुरवात केली आहे, तर काहीजण हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये बिले देणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची बिले कृषी खात्याला मिळाल्यावर टप्प्याटप्प्याने हमीदर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या