पावसापूर्वी काजू खरेदी होणे गरजेचे

dainik Gomantak
सोमवार, 4 मे 2020

लॉकडाउनमुळे वाहतूक ठप्प झाल्याने आधीच जेरीस आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मॉन्सूनपूर्व पाऊस लवकर आल्यास वाढण्याची शक्यता असल्याचे पाहायला मिळते. विशेष करून काजू उत्पादकांचे उत्पन्न असलेले काजू मॉन्सूनच्या पावसामुळे खराब होण्याची शक्यता असल्याने या गरीब शेतकऱ्यांची अवस्था ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी होऊ शकते.

पणजी

लॉकडाउनमुळे वाहतूक ठप्प झाल्याने आधीच जेरीस आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मॉन्सूनपूर्व पाऊस लवकर आल्यास वाढण्याची शक्यता असल्याचे पाहायला मिळते. विशेष करून काजू उत्पादकांचे उत्पन्न असलेले काजू मॉन्सूनच्या पावसामुळे खराब होण्याची शक्यता असल्याने या गरीब शेतकऱ्यांची अवस्था ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी होऊ शकते.
काजू उत्पादन हे राज्यातील कृषी अर्थव्यस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. काजू उत्पादकांतर्फे पिकविण्यात आलेले काजू मे महिन्याच्या अखेरपर्यंत विकले न जाता तसेच पडून राहिले, तर राज्याच्या अनेक भागांमधील ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो असे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काजूवर प्रक्रिया करणारे कारखाने आणि काजूची निर्यात सध्या लॉकडाऊनमुळे बंद असल्याने घाऊक व्यापाऱ्यांनी काजूच्या बिया सध्या विकत घेतलेल्या नाहीत, पण काही दिवसांमध्ये गोवा बागायतदार आणि आदर्श कृषी सहकार सोसायटी या संस्थांनी त्यांच्या स्थानिक केंद्रांमध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांचे काजू विकत घेण्यास सुरवात केली आहे, पण काजू उत्पादन होणाऱ्या जागेवरून काजू साठवून ठेवणाऱ्या केंद्रांकडे काजू नेण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन नसल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे.
गोवा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी काजू उत्पादकांना शक्य व जमेल तेवढी मदत करण्याचे प्रयत्न प्रत्येक बाजूने सुरू असल्याचे मनोगत यापूर्वी प्रसिद्धीमाध्यमे आणि वृत्तपत्रांशी बोलताना व्यक्त केलेले आहे. राज्यातील गोवा बागायतदार संघटनेच्या सगळ्या १२ केंद्रांवर काजू गोळा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे, पण मूळ स्रोतांवरून म्हणजे काजू पिकविलेल्या बागायती आणि शेतांवरून काजू आणणे वा त्याची वाहतूक करणे यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे शक्य झालेले नाही.
कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी मागे शेतकऱ्यांकडे पडून असलेला काजू उचलण्यासाठी सरकारची एक खास प्रणाली अथवा व्यवस्था बनविण्याचे नियोजन लवकरच अंमलात आणणार असल्याचे म्हटले होते, पण याविषयी अजूनही काही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. पाऊस सुरु झाल्यावर काजूच्या बिया वातावरणातील थंडावा आणि ओलावा शोषून घेतात आणि नाजूक व मऊ पडतात, ज्यामुळे त्यांची चव, बाह्यरूप आणि बियांचा वास या एकंदर सर्व बाबींवर विपरीत परिणाम होतो. काजू बियांचा दर्जाही त्यामुळे खालावतो, ज्यामुळे त्या निरुपयोगी बनतात व विकण्यास योग्य राहत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होते. या अशा गोष्टींमुळे दूध उत्पादकांमध्ये असलेल्या सहकार क्षेत्राच्या व्यवस्थेप्रमाणे काजू उत्पादकांचे उत्पन्न सहकार तत्वावर ग्रामीण भागातून केले जावे जेणेकरून हातावर पोट असलेल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजूची किंमत मिळेल व त्यांचे पोट भरून अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल, असे मत तज्ञ व जाणकार व्यक्ती सध्या व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या