गोव्यातील कसिनोंना सहा महिन्यांची मुदतवाढ

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

कसिनोंना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.

पणजी :गोव्याची राजधानी पणजी शहराच्या लगत वाहणाऱ्या मांडवी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कसिनोंना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. 2012 मध्ये  सत्तेवर येण्याआधी भाजपने हे कसीनो मांडवी नदीतून इतरत्र हलवावे अशी मागणी केली होती आणि तसे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते.

स्वर्गीय मनोहर परिकर यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर झालेल्या पोट निवडणुकीवेळी काँग्रेसचे उमेदवार आतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी 100 दिवसात कसिनो हटविण्याचे आश्वासन दिले होते. नंतर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक सहा महिन्यांसाठी कसीनो ना मांडवीत नदीत राहण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात येत आहे हे कसिनो इतर नद्यांच्या पात्रात हलवण्यास त्या त्या भागातील जनतेकडून विरोध करण्यात येत आहे.

गोवा विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून

त्यामुळे सरकारपुढे मुदतवाढ देणे शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही जनमताच्या रेट्यामुळे सरकारने गोमंतकीयांना या कसिनोंवर जाण्यासाठी बंदी घातलेली आहे. 
सरकारने थकित वीज बिले फेडण्यासाठी आणखीन एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेली अनेक वर्षे थकित असलेली वीजबिले भरण्यासाठी थकीत वीज बिल योजना सरकारने कार्यान्वित केली आहे. त्यानुसार एक रकमी वीजबिल फेडल्यास विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. डिसेंबर पासून ही योजना सुरू झाली असून दोन वेळा तिला आजवर मुदतवाढ देण्यात आलेली होती.

संबंधित बातम्या