‘कसिनो आमका नाका‘

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

राज्य सरकारने कसिनोंना मुदतवाढ देऊन ती संस्कृती अधिक रुजविली आहे. नदीमध्ये कसिनो आणून पर्यावरणाचा नाश सुरू झालेला आहे. आपल्या स्वार्थासाठी राज्य सरकारने कसिनो सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका श्री परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी केली.

पणजी : राज्य सरकारने कसिनोंना मुदतवाढ देऊन ती संस्कृती अधिक रुजविली आहे. नदीमध्ये कसिनो आणून पर्यावरणाचा नाश सुरू झालेला आहे. आपल्या स्वार्थासाठी राज्य सरकारने कसिनो सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका श्री परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी केली. आज सकाळी श्री परशुराम गोमंतक सेनेच्यावतीने कसिनो बंद करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. परंतु पोलिसांनी या सेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यातच अडविले. त्यावेळी सेनेचे वेलिंगकर म्हणाले की, गोवा राज्य सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये होते, त्यानंतर सरकारने केलेल्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले.

दररोज पाच ते दहा जण गोमंतकीयांचा या महामारीमुळे बळी जात आहेत. मंदिर, मश्‍जिद, चर्च बंद ठेवून लोकांनी सरकारला सहकार्य केले आहे. परंतु राज्य सरकार कसिनो सुरू करण्याची परवानगी देत आहे. राज्य सरकारची हप्तेखोर संस्कृती असून, ते उघड पाडण्याचे काम आम्ही करीत आहोत. कसिनोमध्ये कोणतेही सामाजिक अंतर राखले जात नाही. कसिनो सुरू झाल्यामुळे गुन्हेगारी, वेश्‍या व्यवसाय वाढू शकतात. त्यामुळे हे सरकार कसिनोवाल्यांचे सरकार काय, असा सवालही वेलिंगकर यांनी उपस्थित केला. याप्रसंगी सेनेचे उपाध्यक्ष सुनील सांतिनेजकर, सचिव आदिश उसगावकर यांच्यासह सेनेचे इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी ‘कसिनो आमका नाका‘ अशा घोषणा देण्यात आल्या.

संबंधित बातम्या