राम मंदिराच्या शिलान्यासानिमित्त फातोर्ड्यात उद्या आनंदसोहळा 

प्रशांत शेट्ये
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

अयोध्यानगरीत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ होणार असल्याने, त्या कार्यक्रमाचा आनंदसोहळा संपूर्ण भारतभर होणार आहे.

मडगाव
अयोध्यानगरीत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ होणार असल्याने, त्या कार्यक्रमाचा आनंदसोहळा संपूर्ण भारतभर होणार आहे. फातोर्डा मतदारसंघातही हा आनंदसोहळा प्रत्येक घराघरात होणार आहे. 
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी फातोर्डा भाजप मंडळाची रविवारी तातडीची बैठक भाजपचे राज्य सरचिटणीस दामू नाईक यांच्या कार्यालयात मतदार संघाचे प्रभारी तथा भाजपचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष तुळशीदास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला तुळशीदास नाईक आणि भाजपचे फातोर्डा मंडळ अध्यक्ष मनोहर बोरकर यांनी मार्गदर्शन केले. मतदारसंघात राम मंदिर शिल्यान्यास सोहळ्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी ठराविक जाग्यावर बॅनर लावण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर मतदारसंघातील देवस्थान समित्यांनी बुधवारी ५ ऑगस्ट रोजी मंदिरात दुपारी बारा वाजून बारा मिनिट व बारा सेकंदाच्या मुहूर्तावर सामाजिक अंतर राखून व मास्क वापरुन शंख नाद, घंटा नाद व आरत्या कराव्यात. संध्याकाळी मंदिरवर रोषणाई करून, पणत्या लावून तसेच समस्त भाविकांनी घरी गोड धोड करून आपापल्या घरात पणत्या लावून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन बोरकर यांनी केले. हा आनंदसोहळा दिवाळीच्या रुपात साजरा व्हावा असा मानस त्यांनी व्यक्त केला. नुकतेच दिवंगत झालेले माजी सभापती अनंत शेट यांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दामू नाईक यांनी शेट यांच्या आठवणींना उजाळा दिला. फातोर्डा मंडळाचे सरचिटणीस प्रमोद नाईक यांनी आभार मानले.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या