कृषी विज्ञान केंद्राचा मत्स्य पालनासाठी भर

उत्तम गावकर
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तसेच एकात्मिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्य पालन करण्यासाठी भर देण्यात येत आहे.

सासष्टी: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तसेच एकात्मिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्य पालन करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्राकडून दक्षिण गोव्यातील दहा शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर मोफत गोड्या पाण्यातील मासळीचे बीज वितरित करून प्रशिक्षण देण्यात आलेले असून यापुढे प्रत्येक तालुक्यातील एक शेतकऱ्यांची निवड करून मत्स्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. गोव्यात गोड्या पाण्यातील मासळी खाण्यास खवय्यांना क्रेज असल्यामुळे या मासळीसाठी भरपूर मागणी येणार तर गोव्यात मत्स्यशेतीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारद्वारे विविध योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी एकात्मिक शेती करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. एकात्मिक शेतीअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीबरोबरच मत्स्यपालन, पशुपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. गोवा कृषी विभागाच्या असलेल्या योजनेअंतर्गत शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शेततळी उभारून देण्यात येत असून या शेततळीचा वापर सिंचन तसेच मत्स्य पालनही करण्यासाठी शेतकरी करू शकतात. या तळीत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन करण्यासाठी सध्या भर देण्यात आला आहे, अशी माहिती दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ हृषीकेश पवार यांनी दिली. 

केरी येथे असलेल्या मत्स्यपालन विभागाचा मत्स्य बीज उत्पादन केंद्रातून गोड्या पाण्यातील मृगल, सिप्रिनस, रोहू आणि कटला आदी मासळीचे बीज ३० पैसे प्रति बीज विकत घेऊन दक्षिण गोव्यातील दहा शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर एक हजार बीज वितरित करण्यात आलेले आहे. या जातीच्या मासळीच्या बीजांना वाढण्यासाठी दहा महिन्याचा कालावधी लागतो तर या माशांची एक किलोच्या आसपास वाढ होते. या माशांना शेंगदाण्याची पेण आणि भाताचा कोंडा खुराक म्हणून देण्यात येतो तर मासळी ज्याप्रमाणे वाढते त्याप्रमाणे खुराकही वाढविणे आवश्यक आहे, असे हृषीकेश पवार यांनी सांगितले. 

एकात्मिक शेतीवर लक्ष केंद्रित करून यंदापासून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, यासाठी  शेतकऱ्यांना मत्स्यपालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले असून गोड्यापाण्यातील मासळीची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले आहे. पक्षापासून मासळी सुरक्षित ठेण्यासाठी शेततळीच्या वरती नेट बसवावे तर शेततळी तुडुंब भरू नये, याची शेतकऱ्यांनी सतत काळजी घेणे आवश्यक आहे.  शेतकऱ्यांना प्रतिकिलो मासळीच्या विक्रीतून १८० ते २०० रुपये मिळणार असून गोव्यात मासळीला सतत मागणी असल्यामुळे विक्रीसाठी कुठल्याही प्रकारच्या मार्केटिंगची गरजही भासणार नाही, असे हृषीकेश पवार यांनी सांगितले. 

एकात्मिक शेतीलाही प्रोत्साहन मिळणार..!
दक्षिण गोव्यात कृषी विज्ञान केंद्राचा फार्मवर  उपलब्ध असलेल्या दोन तळीत मत्स्यपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुरुवातीला दहा शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर मत्स्यपालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून यापुढे मत्स्यपालन करण्यासाठी दक्षिण गोव्यातील प्रत्येक तालुक्यात एका शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश या नागरिकबरोबर गोव्यातही गोड्या पाण्यातील मासळी खाण्यास पसंत करण्यात येत असून शेतकऱ्यांना या उपक्रमातून निश्चितच नफा होणार आहे. शेतीबरोबर मत्स्यपालन केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार तर एकात्मिक शेतीलाही यातून प्रोत्साहन मिळणार, अशी माहिती दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्रचे प्रकल्प संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.

संबंधित बातम्या